Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतात. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला. लाडक्या बहिणींसाठी ही एक रक्षाबंधनाची भेट ठरली. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. योजना तर सुरूच राहणार आहे आणि त्यासोबतच योजनेच्या हप्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्रात आपण अनेक योजना सुरू केल्या. त्यापैकी एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं सुरू केलं. अनेकांना वाटायचं की, निवडणुकीपूरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की, सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत. पण हे सर्व विरोधकांनी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजुला झालं. आपण निवडणुकीनंतर सुद्धा ही योजना सुरू ठेवली. पुढचे पाचही वर्षे ही योजना राहणार आहे. इतकेच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीतही आम्ही वाढ करणार आहोत.
26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी; जिल्हानिहाय यादी तयार
राज्यभरातील तब्बल 26 लाख महिलांची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांची पात्रता तपासली जाणार आहे. महिला बालविभागाकडून तसे जिल्हा प्रशासनाला आदेस देण्यात आले आहेत. अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.