धम्मध्वज यात्रेचे छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात स्वागत; आंदोलनाचा पुढील निर्णय चैत्यभूमीत होणार
बिहार सरकार हिंदुत्ववादी दबावाखाली आहे, बीटीएमसीचा काळा कायदा आम्ही मान्य करणार नाही, महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही! या आक्रमक शब्दांनी क्रांतिकारी भन्ते विनाचार्य यांनी सोमबारी दि.२५ छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या ऐतिहासिक धम्मध्वज यात्रेला जाज्वल्य दिशा दिली. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून निघालेली ही धम्मध्वज यात्रा अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली क्रांतिचौकात
दाखल झाली. भन्ते विनाचार्य, भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो, भन्ते संघप्रिय, भन्ते नागसेन व भन्ते आर. आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणगेट, औरंगापुरा, खोकडपुरा, मिलकॉर्नर, मिलिंद महाविद्यालय, विद्यापीठ गेट असा मार्गक्रमण करत यात्रा बुद्धलेणीवर पोहोचली. हजारो उपासक उपासिका पांढऱ्या वस्त्रात, हातात पंचरंगी धम्मध्वज घेऊन सहभागी झाले होते. प्रत्येक चौकात ढोल-ताशांचा गजर, घोषणांचा जयघोष, पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण शहर धम्ममय झाले. महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून
क्रांतिकारकांना वंदन करण्यात आले. सभेत बोलताना भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो म्हणाले धम्मध्वज यात्रेचा उगम बुद्धलेणीवर झाला. आम्ही कारावास भोगला, आंदोलन थांबविण्याचे प्रयत्न झाले, पण लढा कधी थांबला नाही. आजही हा प्रश्न ज्वलंत आहे. भन्ते विनाचार्य यांनी आंदोलनाच्या इतिहासावर प्रकाश टाकत तिखट शब्दांत सरकारवर हल्ला चढवला – भन्ते अनागारिक धम्मपाल यांनी महाबोधी मुक्तीसाठी जागतिक पातळीवर लढा उभारला. तरीही बिहार सरकार हिंदुत्ववादी दबावाखाली ५० वर्षांपासून बौद्धांच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. बीटीएमसी
१०४९ या काळ्या कायद्याखाली महाविहार बौद्धांच्या हातातून हिसकावला गेला. भिक्खूंनी बलीदान दिले, रक्त सांडले तरीही सरकार बहिरे बनले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाखाली आंदोलन दडपण्याचा कपटप्रयत्न झाला. पण आता हा संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ते पुढे म्हणाले चैत्यभूमीवरून या लढ्याचा नवा अध्याय सुरू होईल. २ सप्टेंबर रोजी चैत्यभूमीच्या महासभेत आंदोलनाची दिशा ठरेल. लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर उपस्थित राहा. हा अन्याय आम्ही थांबवणार नाही.
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी निर्णायक रणशिंग चैत्यभूमीवर फुंकले जाईल! यात्रेच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय भिक्खू संघ, सर्व आंबेडकरबादी संघटना आणि बहुजन विकास समितीचे दीपक निकाळजे, कुंदन लाटे, धम्मा धन्वे, प्रांतोष बाघमारे, अमित वाहूळ, कपिल बनकर, विष्णू जगताप, अरविंद कांबळे आदींनी परिश्रम घेतले. छत्रपती संभाजीनगरातील धम्मध्वज यात्रेने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा ज्वालामुखी पुन्हा पेटवला असून, चैत्यभूमीच्या महासभेची प्रतीक्षा आता संपूर्ण देश करीत आहे.