Maharashtra Work Hours : महाराष्ट्र राज्यात कामाचे तास 10 होणार ?

Maharashtra Work Hours  : राज्य सरकार ( खासगी क्षेत्रात ) कामाचे तास वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

सदर प्रस्ताव खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लागू होईल. सध्या, महाराष्ट्रात 9 तास काम करण्याचा नियम आहे, जो वाढवून 10 तास करण्यावर काम सुरू आहे.

मुंबई :  राज्य सरकार कामाचे तास वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार, कामाचे तास 9 वरून 10 तास केले जाऊ शकतात. तसेच, महिलांनाही नाईट शिफ्टमध्ये काम देण्याचा उल्लेख या प्रस्तावात करण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मते, प्रस्तावावर काम सुरू झाले आहे, मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण हा प्रस्ताव येताच एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.

हे बदल लागू झाल्यास महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स ( रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडीशन्स ऑफ सर्व्हिस ) ऍक्ट, 2017 मध्ये बदल करावा लागेल, असे म्हटले जात आहे. हा कायदा दुकाने, हॉटेल्स, मनोरंजन केंद्रे आणि खासगी व्यवसायांमध्ये कामाचे तास आणि नोकरीच्या अटी ठरवतो.

चुकीचे परिणाम होऊ शकतात… 

महाराष्ट्र सरकारच्या या प्रस्तावावर PHDCCI चे CEO आणि सचिव रणजीत मेहता यांनी मीडिया सोबत बोलताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव उद्योगातील उत्पादन वाढवण्याच्या दिशेने एक विचार आहे. पण PHDCCI च्या मते, कामाचे तास वाढवण्याचे काही चुकीचे परिणाम देखील होऊ शकतात.

ते म्हणाले की, यामुळे कामगारांची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि याचा परिणाम कामाच्या ठिकाणी नावीन्य (Innovation) कमी होण्यावर होऊ शकतो. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नवीन नाविन्यपूर्ण पद्धती तयार केल्या जाऊ शकतात. उत्पादकता वाढवण्यासाठी या पद्धतींवर राज्य सरकारने विचार करावा.

महिलांच्या नाईट शिफ्टसाठी आवश्यक सुविधा

महिलांच्या नाईट शिफ्टच्या प्रस्तावावर PHDCCI चे CEO रणजीत मेहता म्हणाले की, महिलांना नाईट शिफ्टमध्ये काम करण्याचा प्रश्न आहे, यावर आमचे मत आहे की महिलांना नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली पाहिजे. मात्र यासाठी कामाच्या ठिकाणचे वातावरण अधिक सुरक्षित बनवणे अत्यंत आवश्यक असेल. तसेच, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी पिकअप आणि ड्रॉपिंगची सुविधा अनिवार्य असावी.