ठाणे: ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी 17 सप्टेंबरपासून शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. पुढील 3 दिवस, म्हणजेच 17 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात 20 चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल होणार असून, वाहनचालकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.
अवजड वाहने ठाण्यात येऊ न देण्याचा निर्णय : याचप्रमाणे, कळवा, मुंब्रा, नारपोली, भिवंडी आणि कोळगाव येथील प्रवेश मार्गांवरही अवजड वाहनांसाठी ‘नो एंट्री’ असेल. मुंबईहून येणारी वाहने शीळफाटा मार्गे, मुंब्राहून येणारी वाहने बायपास मार्गे आणि नाशिक, वाडा तसेच भिवंडीहून येणारी वाहने बायपासचा वापर करून शहराबाहेरूनच जातील. या बदलांमुळे शहराच्या रस्त्यांवरील भार कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
कोपरी नाका, कासारवडवली इथे पोलीस तैनात : या आदेशानुसार, मुंबई, नवी मुंबई आणि घोडबंदरहून येणाऱ्या अवजड वाहनांना ठाणे शहरात येण्यापासून रोखले जाणार आहे. कोपरी नाक्याजवळ आणि कासारवडवली येथे पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. ही वाहने शहरात न येता पूर्व द्रुतगती महामार्गावरून आणि घोडबंदर रोडवरूनच पुढे जातील.
ठाण्यात अवजड वाहनांना कुठे असेल प्रवेश बंद
- आनंद नगर चेक नाका: मुंबई आणि नवी मुंबईकडून आनंद नगर चेक नाका मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कोपरी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत आनंद नगर चेक नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- निरा केंद्र आणि गायमुख घाट : मुंबई, विरार आणि वसईकडून घोडबंदर रोडने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कासारवडवली वाहतूक उप विभागाच्या हद्दीत निरा केंद्र आणि गायमुख घाट येथे प्रवेश बंद आहे.
- मॉडेला चेक नाका: मुंबईहून एल.बी.एस. रोड मार्गे ठाण्यात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वागळे वाहतूक उप विभागाच्या हद्दीत मॉडेला चेक नाका येथे प्रवेश बंद असेल.
- विटावा जकात नाका: बेलापूर, ठाणे रोड आणि विटावा जकात नाका मार्गे कळव्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कळवा वाहतूक उप विभागाच्या हद्दीत विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- दहिसर मोरी: महापे, नवी मुंबई आणि शीळफाटा येथून ठाणे आणि कल्याणकडे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना मुंब्रा वाहतूक उप विभागाच्या हद्दीत पूजा पंजाब हॉटेल आणि दहिसर मोरी येथे प्रवेश बंद राहील.
- चिंचोटी वसई रोड: गुजरातहून चिंचोटी नाका मार्गे नारपोली वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना नारपोली वाहतूक उप विभागाच्या हद्दीत 72 गाळा, चिंचोटी वसई रोड येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- भिवंडी वाहतूक उप विभाग: वाडा रोड, नदीनाका, पारोळ फाटा, धामणगाव आणि जांबोळी पाईपलाईन नाका मार्गे भिवंडी शहरातून येणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत प्रवेश बंद असेल.
वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, हा आदेश 17 सप्टेंबरपासून ते 19 सप्टेंबरपर्यंत लागू असेल. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.