मुंबई:  नाशिकमधील 1995 सालच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री माणिराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवला आहे, अशी माहिती आहे.

कोकाटे यांच्याकडील सर्व खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. कोकाटे यांना अटक करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही खाती काढून घेण्याची शिफारस राज्यपाल आचार्य देवव्रत यांना केली होती. त्यानुसार राज्यपालांनी हे आदेश दिले आहेत. कोकाटे यांच्याकडील सर्व खाते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं सोपवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारशीनंतर राज्यपालांनी तसा आदेश दिला आहे.

नाशिकमधील 1995 सालच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरण ?

नाशिकमधील 1995 सालच्या एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाने आता कोकाटे यांची कोंडी केली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आमदारकीही जाऊ शकते : मात्र उच्च न्यायालयातून त्यांना दिलासा मिळाला नाही  त्यांची आमदारकीही जाऊ शकते.  तसंच त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. दरम्यान,माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवला आहे. पण, त्यांचं मंत्रिपद अजूनही राष्ट्रवादीकडून कायम ठेवण्यात आलं आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यावर शुक्रवारी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोकाटे तोपर्यंत बिनखात्याचे मंत्री राहतील.

कोकाटे यांनी त्यांच्या नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेल्या अटकेच्या आदेशाला  हायकोर्टात आव्हान दिलंय. त्यावर हायकोर्ट शुक्रवारी निर्णय देणार आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानंतरच अजित पवार यावर निर्णय घेतील असं मानलं जात आहे.