पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि स्थानिकांच्या मदतीसाठी पोहोचलेल्या भाजप खासदार खगेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष यांच्यावर जमावानं हल्ला केला. हल्ला झाल्यावर खासदार, आमदार तिथून निघू लागले. तेव्हा जमावानं त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. वाहनावर दगडफेकदेखील करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या कारचं नुकसान झालं.
स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत खासदार खगेन मुर्मू यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे. तर शंकर घोष यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. हल्यात ते अक्षरश: रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती आहे.
या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. आपत्ती येऊन गेल्यावर बरेच दिवस लोटल्यावर लोकप्रतिनिधी आढावा घेण्यासाठी आल्यानं जनक्षोभ उसळल्याचं स्थानिक सांगत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. अद्याप तरी कोणालाही अटक झालेली नाही.
उत्तर बंगालमध्ये नुकताच पूर येऊन गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचा जीव गेला आहे. लोकांचं मोठं नुकसान झालं. नागराकाटासह अनेक दिवस मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या कालावधीत परिसरात तणावाची स्थिती आहे. पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि होमगार्डमध्ये नोकरी जाहीर केली आहे.