अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) ऑनलाइन तक्रार दाखल करणे, काही मदत हवी असल्यास मदतवाहिनी क्रमांक आणि अत्याचार पीडितांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) नियंत्रणाखाली हेल्पलाइन सुरू केली आहे. ही हेल्पलाइन प्रथमच राज्यासाठी तयार केली आहे. आतापर्यंत राज्यातून दाखल तक्रारी या केंद्रीय हेल्प लाइनकडे दाखल करण्यात येत होत्या.
‘नॅशनल हेल्पलाइन अगेन्स्ट ॲट्रॉसिटी‘ नावाचे पोर्टल राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. आतापर्यंत या कायद्यांतर्गत तक्रारी या थेट या राष्ट्रीय पोर्टलवर दाखल करण्यात येत होत्या. या पोर्टलवरून या तक्रारी राज्याकडे वर्ग करण्यात येत होत्या. त्यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्रासाठी नवी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या प्राथमिक स्तरावर हेल्पलाइन सुरू असून, ती नागरिकांसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.
बार्टीच्या नियंत्रणाखाली राहणार यंत्रणा पोर्टलवर जाऊन नागरिक ॲट्रॉसिटीशी संबंधित तक्रारी दाखल करू शकणार आहेत. तक्रारी संबंधित पोलिस ठाणे, अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या जातील. अत्याचार पीडितांना मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याबाबतही पोर्टल किंवा हेल्पलाइन क्रमांकावर दाद मागितल्यास दखल घेतली जाईल. या माध्यमातून तक्रारींची सद्यः स्थितीदेखील समजणार आहे, असेही वारे यांनी सांगितले.
नॅशनल हेल्पलाइन अगेन्स्ट ॲट्रॉसिटी
राष्ट्रीय पोर्टल : https://nhapoa.gov.in/en
ॲट्रॉसिटी टोल फ्री क्रमांक १८००२०२१९८९, 1800201989
ॲट्रॉसिटी नॅशनल हेल्पलाइन क्रमांक- १४५६६, 14566