नागपुरातील हृदयद्रावक घटना, मदत न मिळाल्याने पत्नीचा मृतदेह बाईकला बांधून नेण्याची वेळ

Nagpur News: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारं दृश्य पाहायला मिळालं. एका ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, मदत मागूनही कोणीही न थांबल्याने एका हतबल पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारची ही घटना आहे. मृत महिलेचे नाव ग्यारसी अमित यादव असून, तिच्या पतीचे नाव अमित यादव आहे. हे दोघेही मध्यप्रदेशातील सिवनी येथील रहिवासी आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून कोराडी नजीकच्या लोणारा येथे राहत होते.

रक्षाबंधननिमित्त अमित यादव आपल्या पत्नीसह लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात असताना, मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारला. यात ग्यारसी रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर हतबल पतीने मदतीसाठी अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र हात जोडले, पण कोणीही थांबले नाही. “भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला, कोणीही वाहन थांबवायला तयार नव्हते. माणुसकी दाखवायला तयार नव्हते”, असे म्हणत अमित यादवने आपली आपबिती सांगितली.

जेव्हा कोणतीही मदत मिळाली नाही, तेव्हा हतबल झालेल्या पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि तो मध्यप्रदेशातील आपल्या गावी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हा हृदयद्रावक क्षण पाहून अनेकांनी मदतीसाठी पुढे न येण्याच्या मानसिकतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर, महामार्ग पोलिसांनी त्याला अडवले आणि ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.