मुंबई : 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा केला जाईल. मात्र यंदाचा स्वातंत्र्यदिन हा 78 वा आहे का 79 वा असा प्रश्न अनेकांना पडलाय. खरंतर दरवर्षीच हा प्रश्न भारताच्या नागरिकांना पडत असतो. याचं नेमकं उत्तर अनेकांना जंगजंग पछाडल्यानंतरही सापडत नाही. अत्यंत सोप्या भाषेत आम्ही ही शंका दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला खात्री आहे की ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न कधीही सतावणार नाही.
वर्धापनदिन आणि स्वातंत्र्यदिन संभ्रम का होतो ?
लोकं वर्धापनदिन आणि स्वातंत्र्यदिन यामुळे गोंधळतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचा स्वातंत्र्यदिन 78 का 79 वा असा प्रश्न पडतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तो दिवस ‘पहिला स्वातंत्र्यदिन’ म्हणून गणला गेला. त्यानंतर 1948 मध्ये पहिला वर्धापनदिन साजरा झाला. त्यामुळे 2025 मध्ये 78वा वर्धापनदिन असला, तरी तो 79वा स्वातंत्र्यदिन असेल. थोडक्यात, 78वा वर्धापनदिन आणि 79वा स्वातंत्र्यदिन हे दोन्ही आकडे बरोबर आहेत, पण ते वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात.
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला वर्धापनदिन पुढच्या वर्षी म्हणजे 15 ऑगस्ट 1948
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 हा आपला पहिला स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो आणि तोच स्वातंत्र्यदिन आहे. त्याच दिवशी भारताने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला एक वर्ष पूर्ण झालं. हा भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला वर्धापनदिन होता. यानुसार
- 15 ऑगस्ट 1948 – पहिला वर्धापनदिन
- 15 ऑगस्ट 1949 – दुसरा वर्धापनदिन
- 15 ऑगस्ट 2020- 73 वा वर्धापनदिन
- 15 ऑगस्ट 2024 – 77वा वर्धापनदिन
असं गणित मांडल्यास, 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे 2025 साली म्हणजेच यंदाच्या वर्षी भारताचे नागरिक स्वातंत्र्याचा 78वा वर्धापनदिन साजरा करणार आहोत.
स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचं गणित 79वा स्वातंत्र्यदिन कसा ?
स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचं गणित वेगळं आहे. वर्धापनदिन हा वर्ष पूर्ण झाल्यावर मोजला जातो, तर स्वातंत्र्यदिन हा 1947 पासून सुरू होतो. 1947 हा आपला पहिला स्वातंत्र्यदिन होता.
- 15 ऑगस्ट 1947 – पहिला स्वातंत्र्यदिन
- 15 ऑगस्ट 1948 – दुसरा स्वातंत्र्यदिन
- 15 ऑगस्ट 2024 – 78वा स्वातंत्र्यदिन
- या गणितानुसार, 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण आपला 79वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत.