वकिलाकडून सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा

नवी दिल्ली: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानं सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला लगेच ताब्यात घेतलं. या सगळा घटनाक्रम सुरु असताना सरन्यायाधीश गवई शांत होते. त्यांनी न्यायालयीन सुनावणी सुरुच ठेवली. मला काहीही फरक पडत नाही, असं म्हणत सरन्यायाधीशांनी घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचं न्यायदानाचं काम सुरु ठेवलं.

न्यायालयात सुनावणी सुरु असताना वकील डेस्कजवळ गेला. त्यानं बूट काढून तो सरन्यायाधीशांच्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी हस्तक्षेप केला आणि वकिलाला बाहेर नेलं. सनातनचा अपमान सहन करणार नाही, असं वकील ओरडला. राकेश किशोर असं आरोपी वकिलाचं नाव आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याची नोंदणी २०११ मध्ये झालेली आहे.

वकिलानं सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांमुळे पुढचा अनर्थ टळला. या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीत सरन्यायाधीश गवई अविचलितपणे काम करत होते. तुम्ही आपापला युक्तिवाद सुरु ठेवा, अशा सूचना त्यांनी वकिलांना दिल्या. ‘आपण सगळ्यांनी याकडे लक्ष देऊ नये. माझ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही,’ असं सरन्यायाधीश गवई म्हणाले. प्रकरणाचं गांभीर्य पाहता लगेच कार्यवाही करण्यात आली आणि न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा घडलेली घटना अतिशय दु:खद असल्याचं एका वकिलानं म्हटलं. ‘भरकोर्टात एका वकिलानं सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. ते आमच्या बारचे सदस्य आहेत. आम्ही आताच माहिती घेतली. त्या वकिलानं २०११ मध्ये सदस्यत्व घेतलेलं आहे,’ अशी माहिती वकिलानं दिली.
न्यायालयात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी विष्णू भगवान प्रकरणात एक टिप्पणी केलेली होती. त्यावरुन असा प्रयत्न (वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न) झाला. हा प्रकार दु:खद असून आम्ही याचा निषेध करतो. या प्रकरणी कारवाई व्हायला हवी, अशी माहिती वकिलानं दिली.