आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे.
Manoj Jarange Patil Morcha Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेले निघालेले मराठा बांधवांचे वादळ मुंबईमध्ये दाखल झाले आहे. लाखो मराठा बांधव आणि हजारो गाड्यांच्या ताफ्यासह मनोज जरांगे हे राजधानीत दाखल झाले आहेत. मुंबईमधील आझाद मैदानावर आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, “आपले ठरले होते की उपोषण आझाद मैदानावरच करायचे, आणि त्याप्रमाणे आपण उपोषण सुरू केले आहे.” ते पुढे म्हणाले की, “सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हते, म्हणून मराठ्यांनी मुंबईत जाऊन मुंबई जाम करण्याचा निर्णय घेतला, आणि आपण ते केले.” आता सरकारने आंदोलनाला परवानगी देऊन सहकार्य केले असल्याने, त्यांनीही सरकारचे कौतुक केले. आता सरकारने सहकार्य केले आहे, म्हणून आपणही सरकारला सहकार्य केले पाहिजे,” असे सांगत त्यांनी आपल्या समर्थकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
वाहतूक नियमांचे पालन: जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मुंबईत आपली एकही गाडी रस्त्यावर राहता कामा नये. पोलीस सांगतील तिथेच गाड्या लावा.” शांतता राखण्याचे आवाहन: त्यांनी आंदोलकांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे आवाहन केले. “मुंबई तुम्ही जाम केली, दोन तासात मुंबई मोकळी झाली पाहिजे. एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे, पोलीस बांधव नाराज झाले नाही पाहिजेत, कुठेही ट्रॅफिक जाम झाली नाही पाहिजे,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
बेमुदत आंदोलन: “जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, तशी बेमुदत मागणी आपण करू. सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. गोळ्या घातल्या तरी आता मागे हटत नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
शांततेचा संदेश: “आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत, गडबड-गोंधळ घालून वाटोळे करू नका,” असे सांगत त्यांनी एकजुटीने आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्याने या आंदोलनाने एक नवीन दिशा घेतली आहे. आता सरकार आणि प्रशासन आंदोलकांच्या मागण्या कशा पूर्ण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.