मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामधून 313 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना न्यायालयाचा मोठा दणका दिला आहे. विशेष न्यायालयाने राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांसह 9 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. सरकारी महामंडळातील 300 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश नावंदर यांनी 28 नोव्हेंबर रोजी आरोप निश्चित केले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार आहे. ही रक्कम राज्यातील मातंग समाजाच्या उन्नतीसाठी दिली जाणार होती. सरकारने 1985 मध्ये मातंग समाजातील गरिबीरेषेखालील कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एसएलएएसडीसीची स्थापना केली. हे महामंडळ केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांखाली आर्थिक तरतूद केली जाते. 2012 ते 2013 या दरम्यान कदम महामंडळाचे अध्यक्ष असताना व्यवस्थापकीय संचालकांना केवळ ‘रबर स्टॅम्प’ बनवून नियमित प्रक्रिया डावलून स्वतः प्रत्यक्ष हुकूमशहाप्रमाणे काम केले, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. गरिबीरेषेखालील लोकांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी असलेली निधीची रक्कम कदम यांच्या निकटवर्तीय व नातेवाईकांच्या नावाने बनवलेल्या बनावट संस्थांकडे वळवण्यात आली. त्यानंतर त्या निधीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी मालमत्ता आणि व्यावसायिक कंपन्या खरेदी करण्यासाठी करण्यात आला, असे आदेशात म्हटले आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघातील एनसीपीचे माजी आमदार रमेश कदम यांची 2012 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मातंग समाजाचे मोठे नेते म्हणून रमेश कदम यांची ख्याती आहे. परंतु 2015 साली याच अण्णाभाऊ साठे महामंडळात 312 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर दहिसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निधीत अपहार केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर आणखी पाच जिल्ह्यातही वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आठ वर्षे कारागृहात राहिल्यानंतर 2023 मध्ये रमेश कदम यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सर्व आरोपांचा सारासार विचार करून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा वाटला गेला तो कर्जरूपाने होता, त्यामुळे तो आज ना उद्या परत येईलच असे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कोणताही अपहार झाला नाही, असे सांगितले. गेल्या आठ वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाले. त्यामुळं येत्या आठ ते पंधरा दिवसात ते मतदार संघात जाऊन आपल्या मूळ विधानसभा मतदारसंघाचा अंदाज घेणार आहेत. Post navigationNashik City News: नाशिकमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिव्हर’चे संकट ! ‘बाधित क्षेत्रातील’ 10 किमी परिसरात कडक निर्बंध लागू नाशिक: आश्रम शाळांमध्ये कंत्राटी भरती मागे घेतल्याने ५ महिन्यांनंतर बिर्हाड आंदोलन मिटले