बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलंय. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोसळधार पावसामुळे मुंबईकरांचा वेग मंदावलाय. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (18 ऑगस्ट) मुंबई आणि आसपासच्या भागात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट (Mumbai Rain Red Alert) जारी केला. यानंतर महानगरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली.
सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, नवी मुंबईतील अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले. अंधेरी सबवे, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, हिंदमाता, दादर यासारख्या ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.अधिकारी आणि प्रवाशांच्या माहितीनुसार, रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय. हार्बर मार्गावरील काही स्टेशनच्या रेल्वे रुळावर पावसाचे पाणी साचलंय.
सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोमवारी-मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आलाय. मुंबईमध्ये शनिवारपासून (16 ऑगस्ट) पावसाने जोर धरलाय.
राज्यात पुढील 24 तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलंय.
भारतीय हवामान विभागाकडून 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क करण्यात राहण्याचंही आवाहन करण्यात आलंय. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना 18 ऑगस्ट 2025 रात्री 11.30 वाजेपासून ते 20 ऑगस्ट 2025 रात्री 8.30 वाजेपर्यंत 3.5 मीटर ते 4.3 मीटर इतक्या इंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलाय.
19 ऑगस्ट रोजी मुंबई परिसरातील शाळा, कॉलेजना सुटी द्यायची की नाही? याबाबतचा निर्णय संध्याकाळपर्यंत घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या शाळांना 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.