भारतीय समाजरचनेतील सर्वात मोठा बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. अस्पृश्यतेने होरपळणाऱ्या समाजाला नवे जीवन, नवी ओळख आणि नवा धर्म देण्याचे कार्य त्यांनी केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना नवधम्माचा मार्ग दाखविला. या घटनेने भारतीय इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले. बौद्ध धर्म स्वीकारण्याचा त्यांचा निर्णय हा अचानक घेतलेला नव्हता. धर्मांतराच्या घोषणेपासून ते दीक्षेपर्यंतचा त्यांचा प्रवास हा गंभीर चिंतन, अभ्यास व अनुभवांवर आधारित होता. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनेक धर्मांचा अभ्यास केला. ख्रिस्ती, इस्लाम, शीख, पारशी, हिंदू धर्माची विविध पंथीय रूपे तसेच बौद्ध धर्म – या सर्वांचा त्यांनी गंभीर चिंतनपूर्वक अभ्यास केला. त्यांना असे जाणवले की, इतर धर्मांमध्ये आंधळ्या श्रद्धेला, ईश्वरभक्तीला वा परलोकवादाला जास्त महत्त्व दिले जाते. पण माणसाचे दुःख कमी करण्याची , मानवी हक्काचे वास्तववादी तत्त्वे बौद्ध धर्मात आढळतात. ते म्हणतात – “सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म होय.” (लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पान ४६०) डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्ध वचन सांगायचे,ते म्हणाले बुद्धांनी धर्म सांगताना कधीच सांगितले नाही की, “मी सांगतो म्हणून स्वीकारा.” उलट त्यांनी म्हटले की, विवेकबुद्धीला पटेल तरच स्वीकारा. हे विचारतत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय पटले. त्यांनीच म्हटले की, बौद्ध धर्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला धर्म आहे. तो म्हणजे “रोग निदानानंतर दिलेले औषध” आहे. (खंड १८, भाग ३, पान ४४१-४४२) बौद्ध धर्माची सार्थकता : दुःखनिरोध बुद्धांचे पहिलेच सत्य होते – दुःख आहे. आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. बाबासाहेब म्हणतात – “पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि या दहा पारमिता दुःख निरोध करून दुःखाचा नाश करण्यास समर्थ आहेत. जगातील दुःख निवारण व्हावे हेच बौद्ध धर्माचे सार आहे.” (खंड १८, भाग ३, पान ४४४) धम्मपदातील विचार त्यांच्या मनाला भावले. “निब्बाणं परमं सुखं” — निर्वाण होय ते म्हणतात – भौतिक संपत्ती वा पांडित्य माणसाला खरे सुख देऊ शकत नाही. लोभ, मत्सर, खून, चोरी, परस्त्रीगमन अशा विकारांवर नियंत्रण मिळवणे हाच खऱ्या सुखाचा मार्ग आहे. (खंड १८, भाग ३, पान ४४५) भारतीय समाजरचनेतील सर्वात मोठा दोष म्हणजे जातिव्यवस्था. हिंदू धर्मात जातिभेदावर आधारलेली विषमता टिकवून ठेवली गेली. अस्पृश्यांना माणूसपण नाकारले गेले. याउलट बौद्ध धर्मात जातिभेद नाही. सर्वांना समानतेने वागणूक दिली जाते. डॉ. बाबासाहेबी आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले – “बौद्ध धर्म हाच खरा समतेचा धर्म आहे.” (खंड १८, भाग ३, पान ४३९) त्यांनी हेही ठामपणे सांगितले की, “बौद्ध धर्म व हिंदू धर्म एकच आहेत” असे म्हणणे चुकीचे आहे. (खंड १८, भाग ३, पान ४५५) बौद्ध धर्म : कल्याणकारी आणि हितकारक बाबासाहेब म्हणतात – “बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरिता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे. … जसा ऊस सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोड असतो, तसाच बौद्ध धर्म सुरुवातीलाही, मध्यातही आणि शेवटीही कल्याणकारी आहे.” (खंड १८, भाग ३, पान ४३०) यातून दिसते की, बौद्ध धर्म हा केवळ काही लोकांसाठी मर्यादित नसून, तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माला भारतीय इतिहासातील युगांतकारी घटना म्हटले आहे. ते म्हणतात – “बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही घटना युगांतकारी आहेत.” (खंड १८, भाग ३, पान २०८) अशा प्रकारे त्यांनी समतेच्या दोन घटनाची त्यांनी तुलना केली होती.बौद्ध धर्मामुळे बहुजन समाजाला सुद्धा सिंहासनावर बसण्याची संधी मिळाली. गणतंत्रीय राज्यपद्धतीचा विकास झाला. अशोकासारख्या सम्राटांनी धर्माचा प्रसार करून भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित केला. स्थापत्यकला, चित्रकला, साहित्य व विद्येच्या क्षेत्रात अभूतपूर्व भरभराट झाली. त्यामुळेच ते म्हणाले की, बुद्ध धर्म हा भारताचा खरा वैभव आहे. बुद्धांच्या शिष्यांमध्ये प्रारंभी अनेक ब्राह्मण होते. पण नंतर खालच्या जातीतील लोक भिक्षु होऊन समाजात मान मिळवू लागले. जेव्हा त्यांचा सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही आणि त्यांनी बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याचे प्रयत्न सुरू केले. (खंड १८, भाग ३, पान २०९) धर्मांतराचा अंतिम निर्धार त्यांनी १९३५-३६ मध्येच केला होता. डॉ बाबासाहेबांनी ठरवले होते की, ते हिंदू धर्मात राहणार नाही. पुण्याच्या अहिल्याश्रम मैदानावरच्या भाषणात त्यांनी जाहीर केले – “स्पृश्य हिंदुंनी माझ्यापुढे प्रत्यक्ष परमेश्वर आणून उभा केला तरी मी हिंदू धर्मातून जाणार!” (खंड १८, भाग १, पान ११ जानेवारी १९३६) त्यांनी पुढे आपल्या अनुयायांना स्पष्ट सांगितले “माझ्या सर्व बांधवांना शेवटची हाक देतो की, मुक्ती साधायची असेल तर बौद्ध धर्माची दीक्षा घ्या.” (खंड १८, भाग ३, पान ४३८) आंबेडकरांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना म्हटले – “बौद्ध धम्माचे माझे वेड फार पुरातन आहे.” (खंड १८, भाग ३, पान ४२९) ही ओळ त्यांची अंतःकरणातील ओढ व्यक्त करते. ते फक्त सामाजिक सुधारक नव्हते, तर खरे बौद्ध गृहस्थ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्माबाबतचे विचार हे फक्त तात्विक चिंतन नव्हते, तर ते समाजक्रांतीचे घोषवाक्य होते. त्यांच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा : समतेचा धर्म, विवेकाधारित धर्म, दुःखनिरोधाचा धर्म मानवतेच्या कल्याणाचा धर्म बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे लाखो लोकांना नवे जीवन मिळाले. अस्पृश्यतेच्या अंधःकारातून त्यांनी नवजीवनाचा प्रकाश दाखविला. म्हणूनच आज आपण म्हणू शकतो की, डॉ. आंबेडकरांचे बुद्ध धर्माबाबतचे मत हे केवळ एका धर्माचा स्वीकार नव्हता, तर ती होती – नवभारताच्या समतेची क्रांती.डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बौद्ध धर्मामुळे भारत देश महान आहे.ते म्हणाले “दरेक व्यक्तिमत्वास, समाजास व सरकारास धर्माची आवश्यकता आहे. हे कोणीही नाकारू शकणार नाही. खऱ्या धर्माशिवाय कोणाची प्रगती होणार नाही. तेव्हा कोणता धर्म श्रेयस्कर तुम्ही ठरवले पाहिजे. बौद्धवाद व ब्राम्हणवाद यातील फरक व भेद नीट लक्षात ठेवण्यास मी तुम्हाला सांगत आहे. यापैकी एकाची तुम्हास निवड करावयाची आहे. बुद्ध मानव होते. बुद्धांची तत्वे जातीय वर्गाविरुद्ध होती. बुद्धांनी सामान्य जनतेत वास्तव्य केले आणि मानवी दृष्टिकोनातून जनतेची दुःखी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आजपासून कोणता धर्म तुम्हास उपकारक आहे, हे तुम्हास ठरवावयाचे आहे आणि ते स्वातंत्र्य तुम्हास निर्विवादपणे आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-३, पान नं. २०३) ( दि. २ मे १९५० रोजी दिल्ली येथे भगवान बुद्धांच्या २४९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून डॉ बाबासाहेबांचे भाषण.) डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची माहिती विद्यार्थी जीवनातच मिळाली होते.ते मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर मुंबईला तेथील सामाज सुधारक शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिले व सत्कार केला होता. तेव्हा पासून त्यांना बुद्धाचे महान विचार मिळाले होते. नागपूर येथे धर्मांतर करताना ते म्हणाले माझी नरकातून सुटका झाली आहे.हे म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, लोकांचा प्रश्न असतो दीक्षेसाठी नागपूरच का निवडले? याचे कारण असे की, नागपूर हेच बौद्ध धर्माचे प्राचीन केंद्र होते. विदर्भ ही भूमी बौद्ध धर्माची पवित्र भूमी आहे. म्हणूनच या ठिकाणी धर्मपरिवर्तनाचा सोहळा आयोजित करण्याचे ठरविले. धर्मांतर का? आपल्या समाजाला शेकडो वर्षे अपमान, अस्पृश्यता आणि गुलामी सहन करावी लागली. हिंदू धर्मात आम्हाला मनुष्य म्हणूनही मान्यता दिली गेली नाही. मी १९३५ मध्येच जाहीर केले होते की – “मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.” आज त्या प्रतिज्ञेला पूर्णत्व दिले आहे. हिंदू धर्मातून मुक्ती मिळवून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे, कारण बौद्ध धर्मात समता, बंधुता आणि स्वातंत्र्य आहे बौद्ध धर्म हा केवळ श्रद्धेचा धर्म नाही, तर तो विवेकाचा धर्म आहे. बुद्धांनी कधीच म्हटले नाही की “मी सांगतो म्हणून स्वीकारा.” त्यांनी नेहमीच सांगितले – “विचार करा, विचार पटला तरच स्वीकारा.” बौद्ध धर्म हा दुःख निवारणाचा धर्म आहे. पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता या तत्त्वांमुळे माणसाच्या आयुष्यात खरी शांतता येते. मी माझ्या सर्व बांधवांना आवाहन करतो – जर तुम्हाला खऱ्या अर्थाने मुक्ती हवी असेल तर बौद्ध धर्म स्वीकारा. हा धर्म समतेचा, बंधुत्वाचा आणि मानवी मूल्यांचा धर्म आहे. आज आपण नव्या धर्मात पाऊल ठेवले आहे. या धर्मात अन्याय, विषमता, अस्पृश्यता नाही. हा धर्म सर्वांचा आहे बंधूंनो, आज आपण नव्या युगाची सुरुवात केली आहे. या धर्मामुळे आपल्या जीवनात स्वाभिमान, समानता आणि स्वातंत्र्य येईल. हा धर्म केवळ आपल्या समाजाच्या नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा धर्म आहे. (संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दिक्षा भूमीचे भाषण14 ऑक्टोबर 1956) बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिक्षा घेताना आपल्या अनुयाना 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यामध्येही बुद्ध धम्म केंद्र स्थानी होता. त्यातील निवडक प्रतिज्ञा अशा“मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.” डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भ.बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रन्थ लिहून बौद्ध साहित्यात मोलाची भर टाकली आहे तसेच पाली शब्द कोश व बौद्ध पुजा पाठ ही पुस्तिका उपलब्ध करून दिले. हे दोन्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 16 मध्ये आहे. संविधान सभेत प्रचंड कार्य केले. त्यांनी बौद्ध राजा सम्राट अशोक चक्र राष्ट्र ध्वजावर घेतले आणि तीन सिंहाची मूर्ती भारताचे राष्ट्रीय प्रतीक केले. या वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माला किती श्रेष्ठ समजत होते याची कल्पना यावी.अनिल वैद्य ✍️2 ऑक्टोबर 2025 Post navigation चहाच्या टपरीवरून जिल्हाधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास