मुंबई प्रतिनिधी –  पॅरिस येथील युनेस्को (UNESCO) मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला अत्यंत ऐतिहासिक व जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या ऐतिहासिक घटनेनंतर पॅरिस येथील भारताचे राजदूत व युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी श्री. विशाल व्ही. शर्मा यांनी आज मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथे भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन केले.

चैत्यभूमी येथे बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करताना विशाल शर्मा यांनी बाबासाहेबांचे विचार, कार्य आणि संविधाननिर्मितीतील अतुलनीय योगदान यांचा गौरव केला. यावेळी त्यांनी सांगितले की,

> “युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जगभरातील नागरिकांना भारतीय संविधान, शिक्षण, मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे हा आहे.”

युनेस्कोच्या व्यासपीठावर बाबासाहेबांचा पुतळा उभारला जाणे ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी घटना आहे. बाबासाहेबांचे विचार हे आजही जागतिक पातळीवर सामाजिक समता, लोकशाही, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचे मार्गदर्शक ठरत आहेत.

बुद्ध, धम्म, संविधान आणि मानवमूल्यांचा जागतिक संदेश देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांना युनेस्कोमध्ये मिळालेला हा मान म्हणजे बहुजन समाजाच्या संघर्षाचा आणि विचारांचा जागतिक स्वीकार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.