नाशिक : नाशिक मध्ये वॉटरग्रेसच्या सफाई कामगारांना जातिवाचक बोलून अपमानास्पद वागणूक देऊन सात कामगारांकडून सव्वातेरा लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन मनोहर जाधव (रा. विक्रांती कोट, जुने नाशिक) हे वॉटरग्रेस कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करतात. फिर्यादी जाधव हे सन २०२२ ते जून २०२५ या कालावधीत वॉटरग्रे सच्या य कार्यालयात, तसेच बाहेर रोडलगत बीसार्वजनिक ठिकाणी अशोका स्कूलच्या पाठीमागे महापालिका य पाण्याच्या टाकीलगत अशोका मार्ग येथे महापालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या वॉटरग्रेस या कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करीत असताना वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्सधारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया यांनी संगनमत करून फिर्यादी जाधव यांच्याकडून नोकरीच्या मोबदल्यात दरमहा सहा हजार रुपये व फिर्यादीसोबतच्या इतर सहा कर्मचाऱ्यांकडूनदेखील त्यांच्या नेमणुकीपासून जून २०२५ पर्यंत दरमहा सहा हजार रुपये असे एकूण १३ लाख १६ हजार रुपये
बेकायदेशीरपणे खंडणीस्वरूपात वसूल केले. या पैशांचा वापर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केला. या खंडणीबाबत फिर्यादीसह इतर सहा सफाई कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता त्यावेळी संचालक चेतन बोरा यांनी या सफाई कामगारांविषयी जातिवाचक उल्लेख करून तुम्हाला पैसे द्यावेच लागतील, असे म्हणाले, तर दुसरे
आरोपी दीपक भंडारी म्हणाला, की तुम्ही सफाई कामगार असून, तुम्हाला हेच काम शोभते, तर मॅनेजर अमर कनोजिया म्हणाले, की तुम्ही जंगलात राहणारे आदिवासी असून, तुम्हाला जो पगार मिळत आहे, तोच जास्त आहे. तुम्ही कधीही सुधारणा नाही, तसेच जास्त हुशारी केली, तर नाशिक शहरात व जिल्ह्यात तुमचे राहणे मुश्कील करून टाकीन, असे म्हणत गुपचूप दर महिन्याला सहा हजार रुपये आमच्याकडे जमा करायचे, असे फिर्यादी सचिन जाधव यांना जातिवाचक शब्द वापरून अपमानास्पद वागणूक देऊन दमदाटी केली.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात वॉटरग्रेसचे संचालक चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया यांच्याविरुद्ध खंडणीसह अनुसूचित जमाती प्र-अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.