नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या ३६ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षक आंदोलकांचा धीर सुटला, अधिकाऱ्यांना भेटायला जाताना पोलिसांनी अडवले.
नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रशासन कोणताच प्रतिसाद देत नसल्याने अखेर त्यांचा संयम सुटला. आयुक्तांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवून आमच्या मागण्यांवर चर्चा करावी, असा पवित्रा घेऊन आंदोलक आक्रमक झाले होते. आपला देश उद्या स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेण्याकरिता शासन प्रशासनकडे वेळ नाही, अशा उद्विग्न भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. आदिवासी विकास भवनासमोर आंदोलक अतिशय आक्रमक झालेले होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आदिवासी विकास मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, असा गंभीर आरोप आंदोलकांनी राज्य शासनावर केला.
भरतीमधील बाह्यस्त्रोत रद्द करा, रोजंदारी तासिका तत्वावर शिक्षकांना हजर करून घ्या, अशा प्रमुख दोन मागण्यांसाठी आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या ३६ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र शासन आणि प्रशासनाकडून आंदोलकांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांचा अखेर धीर सुटला. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आदिवासी आयुक्तालयात जाणाऱ्या शिक्षकांनी त्यांना रोखले. यावेळी आम्ही शिक्षक आहोत, दहशतवादी नाही म्हणत आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधी केवळ बघतो करतो, अशी आश्वासने देतात मात्र आमच्या मागण्यांकडे कुणीही लक्ष देत नाही. देशाच्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिकला येणार आहेत. त्यावेळी आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारणार आहोत की तुम्हीही आमच्या बैठकीला होतात, त्यावर काय कार्यवाही केली, कोणती पावले उचलली? असे आंदोलकांनी आक्रमक सुरात सांगितले.