मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी पत्रकाराच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सिंहस्थ बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना त्र्यंबकेश्वरमध्ये काही तरुणांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एकाला नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ही घटना शनिवारी दुपारी स्वामी समर्थ केंद्राजवळील कमान परिसरात घडली. वाहनांच्या प्रवेशासाठी पावत्या गोळा करणाऱ्या काही लोकांनी अचानक पत्रकारांवर हल्ला केला. पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेले असता, संबंधित तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली.
जखमी पत्रकारांना त्र्यंबकेश्वरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका पत्रकाराला नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजणे अशी त्यांची नावे आहेत.
समाजातील सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. भुजबळ यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी पत्रकाराच्या प्रकृतीची विचारपूस केली. भुजबळ यांनी पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.