Nashik Road News: आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा अरविंद पाटील याने स्वतः नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला.

नाशिकच्या जेल रोड, शिवाजीनगर परिसरात राहणारा 58 वर्षीय अरविंद मुरलीधर पाटील या आरोपीने मंगळवारी रात्री त्याची 80 वर्षीय आई यशोदाबाई मुरलीधर पाटील यांची गळा दाबून हत्या केली.

आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा अरविंद पाटील याने स्वतः नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. मला कंटाळा आल्यामुळे मी माझ्या आईची गळा दाबून हत्या केली, मला अटक करा,” असे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. पोलिसांना घरात त्याची वृद्ध आई यशोदाबाई पाटील यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद उर्फ बाळू पाटील हा मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचे उघड झाले आहे.

तो विवाहित असून, त्याच्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नीही त्याला सोडून गेली आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.