
बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आभार पत्र शाळेच्या जागेवरच ‘आदर्श मराठी मॉडेल स्कूल’ उभारण्याची मागणी नगरविकास मंत्री समवेत बैठक आयोजन मागणी!!
नाशिक : बी.डी. भालेकर मनपा शाळा पाडून त्या जागी विश्रामगृह उभारण्याचा नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव रद्द करून तेथे पुन्हा शाळाच सुरू करण्यासाठी निर्णय प्रक्रियेला चालना देण्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीने आज त्यांचे मनःपूर्वक आभार मानत निवेदन सादर केले.
समितीच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन बी.डी. भालेकर शाळा अत्याधुनिक सुविधांसह “आदर्श मराठी मॉडेल स्कूल” म्हणून उभारण्याची मागणी केली. बालवाडीपासून इयत्ता १२ वीपर्यंतचे मोफत शिक्षण, कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज कार्यशाळा, २०० आसनी अद्ययावत सभागृह, शिक्षक व नागरिकांसाठी शैक्षणिक संदर्भ ग्रंथालय अशा सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव समितीने सादर केला.
नाशिक मनपाच्या हद्दीत सध्या १०० शाळांमध्ये साधारण ३२ हजार विद्यार्थी व ९०० शिक्षक कार्यरत असून, या शाळा गरीब, वंचित व स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांसाठी शिक्षणाची आधारस्तंभ आहेत. या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मॉडेल स्कूल उभारणे महत्त्वाचे असल्याचे समितीने नमूद केले.
निवेदन स्वीकारताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की,
“शाळेच्या जागेवरच नवीन शाळा सुरू करू. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीची विशेष बैठक आयोजित करू. कुंभमेळा निधीतूनही शाळा उभारणीसाठी सहकार्याचा प्रयत्न करू.”
समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केले.
या प्रसंगी कॉ. राजू देसले, दीपक डोके, राजेंद्र बागुल, तल्हा शेख, गजू घोडके, पद्माकर इंगळे, वसंत एकबोटे आदी उपस्थित होते.
बी.डी. भालेकर शाळा वाचवा समिती शाळेचे माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी नागरिक
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||


