Nashik चला, आज आपण त्रिरश्मी लेणींना जाऊया… थोडासा लेणी चा अभ्यास करूया.. जरूर तेथे आपले कोणीतरी लेणी संवर्धन मिळतीलच मिळतीलच … नाशिकच्या दक्षिणेला, ८ ते ९ किमी अंतरावर असलेल्या त्रिरश्मी डोंगरांमध्ये ही प्राचीन लेणी स्थित आहेत, काहीच लोक त्यांना पांडवलेणी देखील म्हणतात, जरी पांडव लेणी या नावाने प्रसिद्ध असल्या तरी याच्याशी दूर दूर पर्यंत पांडवांचा काही संबंध नाही…. बरं का, या लेण्यांमध्ये प्राचीन काळातील बौद्ध वास्तुकलेचा समृद्ध वारसा आढळतो. या लेण्या महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली लेणी मानली जातात…..या २४ लेण्यांचा समूह इ.स.पू. पहिल्या शतकापासून इ.स. तिसरे शतकापर्यंत खोदला गेला आहे. यातील शिलालेखांवरून हे निश्चित होते की, या लेण्या खोदण्याचा कालखंड इ.स.पू. पहिल्या शतकात होता. विशेष म्हणजे, या शिलालेखांत प्रथमच ‘लेण’ हा शब्द वापरण्यात आला आणि त्यानंतर पुढे शैल्यगृहासाठी ‘लेणी’ हा शब्द प्रचलित झाला. थोडं सर्व लेणी संवर्धकाने लक्षात ठेवावं….या लेण्या पांडवांशी जोडलेल्या असल्या तरी यांचा पांडवांशी प्रत्यक्षात काहीही संबंध नाही माहिती असावी म्हणून..लेणे क्रमांक २३ मधील बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मूर्तींना पांडव समजले गेले, तसेच असे अद्वितीय काम पांडवांखेरीज कोणी करू शकत नाही, असा जुन्याखाली अपप्रचार झाला असल्याने या लेण्यांना पांडव लेणी असे नाव पडले असावे… आणखी एक मते अशी आहे की, ‘पंडु’ म्हणजे पिवळा, आणि येथे चिवर धारण करणारे बौद्ध भिक्षू राहायचे म्हणून या लेण्यांना पंडू लेणी म्हणायचे. कालांतराने हा शब्द पांडव लेणी असा झाला.या २४ लेण्या त्रिरश्मी डोंगराच्या उत्तरेकडील बाजूस खोदलेल्या आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे या क्रमवारीत लेण्या खोदल्या गेल्या असून, बहुतेक सर्व लेणी हिनयान बौद्ध पंथीयांनी कोरलेली दिसतात. जरी आतले भाग साधे असले तरी बाह्य भाग सुरेख नक्षीकाम आणि शिल्पांनी अलंकृत केलेले आहेत. या शिल्पांमुळे भारतीय लेणी वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या लेण्या ओळखल्या जातात.बंधूंनो, या लेण्यांतील विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शिलालेख. धम्म लिपीत (ब्राह्मी लिपीतील) २७ शिलालेख या लेण्यांत आढळतात. या शिलालेखांतून प्राचीन भारतातील क्षहरात उर्फ क्षत्रप आणि सातवाहन राजवंशांच्या कारकीर्दीचा इतिहास उलगडतो. बहुतेक लेण्या म्हणजे विहार आहेत, पण लेणे क्रमांक १८ हे चैत्य आहे. हे चैत्य कार्ला लेण्यांइतकेच प्राचीन आहे. याच्या दर्शनी भागावरील नक्षीकाम अद्वितीय आहे. लेण्यांमध्ये बुद्धाच्या विविध मुद्रांतील मूर्ती आणि पद्मपाणी व वज्रपाणी बोधिसत्वांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय यक्ष, यक्षी, हत्ती, सिंह, बैल, आणि तत्कालीन समाजजीवन दर्शविणाऱ्या शिल्पांकित प्रतिमाही येथे पाहायला मिळतात. इंडो-ग्रीक वास्तुकलेचा प्रभाव या लेण्यांमध्ये स्पष्टपणे दिसतो. विविध शैली आणि संस्कृतींचा संगम या लेण्यांमध्ये आढळतो, ज्यामुळे या लेण्या भारतीय वास्तुकलेच्या अनोख्या कलाकृती ठरतात.लेण्यांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखांवरून नाशिकवर एकेकाळी तीन प्रमुख राजघराण्यांनी राज्य केल्याचे समजते. हे तीन राजघराणे म्हणजे क्षहरात किंवा पश्चिम क्षत्रप, सातवाहन, आणि अभिर होते. या भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी सातवाहन आणि क्षत्रप यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू होता. तरीही, या तिन्ही राजघराण्यांनी बौद्ध धर्माची उपासना आणि श्रमणसंघाला मदत केली होती, असे शिलालेखांतून दिसून येते म्हणून आपल्याला ह्या तिन्ही राजघराण्यांचा अभ्यास करायला हवा आणि अधिक खोलांमध्ये जाऊन त्या काळातील समाज जीवनाचा बौद्ध धर्माचा अधिक खोला अभ्यास करायला हवा.तसेच राजघराण्यांबरोबरच त्या काळातील जमीनदार, व्यापारी आणि नागरिक यांनीही या लेण्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात दान दिले होते. विशेषतः शिलालेखांमध्ये राजघराण्यातील तसेच व्यापाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनी देखील लेण्यांच्या खोदकामासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. यावरून त्या काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा उच्च होता, असे दिसून येते. तत्कालीन नाशिक व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे तर होतेच, तर सध्याचे गोवर्धन हे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जात होते, याचा उल्लेखही शिलालेखांतून आढळतो.तसेच लेण्यांमध्ये प्राचीन जल व्यवस्थापन तंत्राची स्पष्ट चुणूक दिसते. लेण्यांच्या परिसरात खडकांमध्ये खोदलेली अनेक टाकी आढळतात. या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवून ते पिण्यासाठी तसेच दैनंदिन कामांसाठी वापरले जात असे.लेण्यांमधील लेणी क्रमांक ३, ११, १२, १३, १४, १५, १९ आणि २० मध्ये शिलालेख वाचण्यास योग्य स्थितीत आहेत. या शिलालेखांतून ई.स.पूर्व १०० ते ई.स. १०० या काळातील इतिहासाचा मागोवा घेता येतो. पश्चिम भारतातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा संदर्भ यातून मिळतो. विशेषतः भट्टपालिका, गौतमी बलश्री, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठीपुत्र पुळुमावी, यज्ञश्री सातकर्णी, कान्ह अथवा कृष्ण, हकुसिरी अथवा हकुश्री, क्षहरात, नहपान, उषवदत्त, दक्षमित्रा, माधुरीपुत्र शिवदत्त आणि यवन (इंडो-ग्रीक) धम्मदेव यांची नावे या शिलालेखांतून आढळतात. तसेच शिलालेखांमध्ये भिक्खूंना राहण्यासाठी आणि औषधोपचारांसाठीची तरतूद, दानांचे उल्लेख, युद्ध आणि आर्थिक व्यवहारांचेही संदर्भ आढळतात. त्यामुळे तत्कालीन समाजातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे विस्तृत चित्र या शिलालेखांतून स्पष्ट होते.त्रिरशमी लेण्यांवर जाण्यासाठी सुरेख दगडी पायऱ्या असून पायऱ्यांनी वर चढण्यासाठी साधारणपणे २५ ते ३० मिनिटे लागतात आणि त्यानंतर आपल्याला त्रिरशमी पाहता येते… लेणी वरती बघायचं झालं तर क्रमवारी…लेणी क्रमांक १ हे लेणे पूर्ण झालेले नाही. या लेण्यावर फारसे कोरीवकाम नाही आणि दर्शनी भागात केवळ वरच्या पट्टीवर काही शिल्पकाम दिसते. या लेण्याच्या खोदकामातून लेणी निर्माण प्रक्रियेची माहिती मिळते. हे लेणे कदाचित विहार असावे, ज्यामध्ये समोर चार स्तंभ असण्याची योजना होती. लेण्याचे खोदकाम अर्धवट सोडले गेले असण्याचे दोन कारणे असू शकतात: राज्यकर्त्यांच्या आर्थिक मदतीचा अभाव किंवा खडकांमध्ये काही दोष आढळणे.पुढे लेणी क्रमांक २ हे एक छोटेसे लेणे आहे. याची समोरची भिंत नष्ट झाली आहे किंवा ती पाडली गेली आहे. या लेण्यात दोन छोटे कक्ष दिसतात. आतल्या भिंतीवर बुद्धांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. शिलालेखानुसार मूळ लेणे दुसऱ्या शतकातील असावे, पण सहाव्या शतकात महायान पंथियांनी बुद्ध प्रतिमांची भर घातली असावी.पुढे विशेष लेणे क्रमांक ३ गौतमीपुत्र विहार त्रिरश्मी लेणीतील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे लेणे म्हणजे “गौतमीपुत्र विहार” होय. या लेण्याचा काल अंदाजे इसवी सन १५० च्या आसपासचा मानला जातो. हे विहार सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीच्या मृत्यूनंतर, त्याची आई राणी गौतमी बलश्री हिने तिच्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ खोदवले होते. हे विहार बौद्ध धर्मासाठी समर्पित असून धम्मसंघाला अर्पण करण्यात आले होते. या लेण्यामध्ये असलेले शिलालेख सातवाहन राजवंश, त्यांचे राज्यारोहण, पराक्रम आणि इतर महत्त्वपूर्ण घटनांची माहिती देतात. गौतमीपुत्र विहाराचा दरवाजा सांची स्तूपाच्या तोरणाची आठवण करून देतो. दरवाज्याचे स्तंभ सहा चौकोनांमध्ये विभागले आहेत, प्रत्येक चौकोनात स्त्री-पुरुष युगुलांचे शिल्पपट आहेत. ही जोडपी जणू गौतमीपुत्राच्या आई-वडिलांचे रूपक आहेत. दरवाज्यावर बोधीवृक्ष, धम्मचक्र आणि स्तूप यांची प्रतिमा असून, त्यांची उपासना करणारे भिक्खू आणि नागरिक शिल्पांतून चित्रित केले आहेत. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत, त्यांच्यावर असलेली वस्त्रप्रावरणे व शिरोभूषणे तत्कालीन समाजातील रहिवाशांच्या जीवनशैलीचा दृष्टांत देतात. या विहारातील मुख्य सभागृह आयताकृती असून ४१ फूट रुंद आणि ४६ फूट लांब आहे. येथे भिक्खूंच्या निवासासाठी १८ कक्ष बांधण्यात आलेले आहेत. सभागृहाच्या मध्यभागी असलेल्या भिंतीवर एक उंच स्तूप कोरलेला आहे. स्तूपाच्या दोन्ही बाजूंना स्त्री प्रतिमा आहेत. याशिवाय हाती पुष्पमाला घेऊन गंधर्व आकाशी विहार करताना दाखवले आहेत. विहाराच्या व्हरांड्यात सहा अष्टकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांवर यक्षांच्या प्रतिमा आहेत, ज्यांनी स्तंभांच्या हर्मिका भागाला आधार दिला आहे. स्तंभांच्या शीर्षपट्टीवर हत्ती, सिंह, स्फिंक्स आणि इतर प्राण्यांच्या शिल्पांकित आकृती आहेत. लेणे क्र. ३ मधील स्तंभांच्या अलंकरणाची तुलना अनेकवेळा नहपान विहाराशी (लेणे क्र. १०) केली जाते. या स्तंभांची शैली नहपान विहाराच्या स्तंभांच्या शैलीशी साधर्म्य दाखवते, पण या स्तंभांवरील अलंकरण कमी आणि साधेपणाचे आहे. गौतमीपुत्र सातकर्णीच्या आईने त्याच्या पराक्रमांची प्रशंसा करणारे शिलालेख या विहारात कोरले आहेत. सर्वांत मोठा शिलालेख म्हणजे राजा वशिष्ठिपुत्र पुळुमावीच्या कारकीर्दीत (इसवी सन दुसरे शतक) कोरलेला लेख आहे. या लेखात गौतमी बलश्रीने गौतमीपुत्र सातकर्णीच्या विजयांची, विशेषतः नहपान या क्षत्रपाच्या पराभवाची महती सांगितली आहे. “क्षहरात वंस निर्वंस करस” अशा शब्दांत त्याच्या शत्रूंचा पराभव केल्याचे वर्णन केले आहे. हा शिलालेख नाशिक प्रशस्ती या नावाने ओळखला जातो. या लेखात गौतमीपुत्राच्या शूरपणाचे, प्रजेविषयी त्याच्या कर्तव्यातील निष्ठेचे आणि मातृभूमीबद्दलच्या त्याच्या प्रेमाचे उल्लेख आहेत. गौतमीपुत्र विहार ही भारतातील बौद्ध वास्तुकलेची एक अप्रतिम उदाहरण आहे. या लेण्याच्या स्थापत्यशैलीतून तत्कालीन समाजजीवन, राजकीय घडामोडी आणि धार्मिक परंपरांचा उत्तम ठसा दिसतो.तसेच पुढे लेणे क्रमांक ४ सद्यस्थितीत खूपच खराब अवस्थेत आहे आणि अत्यंत जीर्ण झालेले आहे. या लेण्याची शीर्षपट्टी भौमितिक नक्षीकामाने सजवलेली आहे व लाकूडकामाप्रमाणे ‘डेंटील्स’ कोरलेले आहेत. या लेणीसमूहातील सर्वच लेण्यांमध्ये हे वैशिष्ट्य दिसून येते. इथल्या सर्वच लेण्यांच्या कोरीवकामात हे सर्व बारकावे अतिशय नजाकतीने दाखवले आहेत. व्हरांड्यामध्ये दोन भित्तीस्तंभांच्यामध्ये दोन अष्टकोनी स्तंभ, घंटाकार स्तंभशीर्षासहित कोरलेले आहेत. या स्तंभशीर्षावर हत्ती व माहूत दाखवलेले आहेत, ज्यावर राजपरिवार बसलेला दाखवला आहे. या लेण्याचा दरवाजा अतिशय साधा व अनलंकृत आहे, त्याच्या दोन्ही बाजूला जाळीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. या लेण्याचा पृष्ठभाग बराच खोलगट केला असल्यामुळे त्यात पाणी साचलेले असते. कदाचित या लेण्यात पाणी झिरपत असल्यामुळे त्याचा निवासासाठी उपयोग बंद करून ते पाण्याच्या टाक्यामध्ये रुपांतर केले असावे. या लेण्यामध्ये शिलालेख आढळत नाही.तसेच पुढे लेणे क्रमांक ५ हे अर्धवट खोदलेले दिसते. येथे एक चौकोनी कक्ष खोदण्याचा प्रयत्न दिसून येतो. यात कोणतीही प्रतिमा किंवा शिलालेख नाहीत. भिंतीवर काही कोरण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र ते उत्कीर्णन अगदी अलिकडचे दिसते.तसेच पुढे लेण्यांमध्ये लेणे क्रमांक ६ इतर लेण्यांपेक्षा उंच आहे. हे लेणे भिक्षूंसाठीच्या निवासासाठी असावे. या लेण्यातील दोन अष्टकोनी स्तंभ पाहिल्यानंतर ग्रीको-रोमन वास्तुकलेतील इमारती आठवतात. येथील शिलालेखात, या लेण्याचे खोदकाम एका व्यापाऱ्याने केले असून ते संघाला अर्पण केल्याचे उल्लेख आहे.तसेच पुढे लेणे क्रमांक ७ म्हणजे एक छोटासा देवळीप्रमाणे चौकोनी कक्ष आहे. हा छोटासा कक्ष केवळ बसण्यासाठी उपयोगी असावा. यातील शिलालेखानुसार, ते तपसिनी नावाच्या महिला खोदवून घेतलेले असून संघाला अर्पण केलेले आहे.तसेच पुढे लेणे क्रमांक ८ मध्ये दोन शिलालेख आहेत. त्यानुसार हे लेणे मुगुदासा नावाच्या कोळ्याने खोदवून संघाला भेट दिले आहे.तसेच पुढे लेणे क्रमांक ९ हे लेणे निवासासाठी खोदलेले आहे. याच्या आत विविध कक्ष खोदलेले आहेत. व्हरांड्यात दोन अष्टकोनी स्तंभ खोदलेले आहेत. स्तंभांवर व शीर्षपट्टीवर हत्ती, वृषभ इत्यादी प्राणी विविध मुद्रांमध्ये कोरलेले आहेत. हत्तींवर माहूत आरूढ आहेत तर एका हत्तीने आपल्या सोंडेत एका मनुष्याला पकडलेले दिसते. वृषभ क्रीडांमध्ये रत असल्याचे कोरलेले आहे. या लेण्यात कोणताही शिलालेख नाही.त्यानंतर पुढे अत्यंत महत्त्वाचे लेणे ते म्हणजे लेणे क्रमांक १० “नहपान विहार” हे लेणे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विहार आहे. यात स्तंभ, व्हरांडा, विहार, आणि आतल्या खोल्यांचा समावेश आहे. नहपानाचे एकूण सहा शिलालेख या ठिकाणी आढळतात. हे लेणे ख्रिस्ताब्द शके १२० मध्ये विदेशी क्षत्रप नहपान यांनी खोदवून घेतले. त्यामुळे हे लेणे ‘नहपान विहार’ म्हणून ओळखले जाते. या लेण्याची सुरुवात व्हरांड्यातील स्तंभांपासून होते. येथे सहा स्तंभ (दोन भित्तीस्तंभांसह – Pilasters) कोरलेले आहेत, जे या समूहातील इतर लेण्यांपेक्षा अधिक कलात्मक आहेत. स्तंभांचा आधार असलेले घट घाटदार असून, त्याचे स्तंभशीर्ष उलट्या घटाच्या आकारात नाजूकपणे कोरलेले आहे. स्तंभांवर वरच्या भागात हत्ती, बैल, सिंह यासारखे प्राणी कोरलेले आहेत, तर मागील बाजूस स्फिंक्ससदृश्य प्राणी दिसतात. हे प्राणी इजिप्त किंवा ग्रीक दंतकथांमध्ये आढळतात, ज्यावरून पाश्चात्य संस्कृतीसह व्यापार आणि सांस्कृतिक आदान-प्रदान होत असल्याचे दिसते. व्हरांड्याच्या दोन्ही बाजूंना दोन लहान खोल्या आहेत, ज्यांचा उपयोग ध्यानकक्ष म्हणून होत असे. एका शिलालेखात उल्लेख आहे की दक्षमित्रा या नहपानाच्या कन्येने आणि दिनिकाच्या पुत्र उषवदत्त याच्या पत्नीने या खोल्या खोदवून धम्मसंघास दान केल्या. विहाराचे सभागृह ४३ फूट रुंद आणि ४५ फूट लांब आहे, ज्याला तीन दरवाजे आहेत. आत एकूण अठरा कक्ष आहेत, आणि समोरच्या भिंतीवर स्तुपाची रचना व दोन स्त्री साधकांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. या स्तुपाजवळ मूर्ती नंतरच्या काळात कोरलेली आहे, मात्र मूळ स्तुपाची हर्मिका व तीन छत्र्या शाबूत आहेत. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीचा समकालीन होता, त्यामुळे हे लेणे क्रमांक ३ च्या आधीचे असल्याचे दिसते. व्हरांड्यात शिलालेख कोरलेले आहेत. एक शिलालेख उषवदत्त याने धम्मसंघाला दिलेल्या दानाबाबत आहे. एका शिलालेखात उषवदत्ताने भिक्कूंना अन्न-वस्त्र पुरवण्यासाठी ३००० सुवर्णनाण्यांचे दान दिल्याचा उल्लेख आहे. त्याची पत्नी दक्षमित्राने खोदलेल्या खोल्यांबद्दलही शिलालेखात माहिती आहे. तसेच बाहेरील भिंतीवर पाच फण्यांचा नागासह मूर्ती कोरलेली आहे, जी नंतरच्या काळातील असावी असे मानले जाते.पुढे लेणे क्रमांक ११ “जैन लेणी” हे लेणे क्रमांक १० च्या जवळ, थोड्या उंचीवर आहे. पायऱ्या चढून या लेण्यात प्रवेश करता येतो. येथे जैन धर्मीयांनी तीर्थंकर ऋषभदेव, वाघावर आरूढ यक्षी अंबिका आणि ऐरावतावर बसलेले इंद्र यांच्या मूर्ती कोरल्या आहेत. या लेण्याचा उपयोग इ.स. ११व्या शतकात जैन धर्मीयांनी केला असे म्हणतात. लेण्यात एक शिलालेख आढळतो, ज्यात शिवामित्राचा पुत्र रामनक यांनी हे लेणे दान केल्याचा उल्लेख आहे.तसेच लेणी क्रमांक १२ ही लेणी भिक्खूंनी निवास किंवा साधनेसाठी खोदलेली आहेत. १२व्या लेण्यात रामनक यांनी भिक्खुसंघाला वस्त्र पुरवण्यासाठी १०० काशार्पणांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे.तसेच लेणे क्रमांक १३ फक्त कक्ष आहेत आणि कोणताही शिलालेख नाही.तर लेणे क्रमांक १४ मध्ये भगवान बुद्ध आणि बोधिसत्वांची शिल्पे आहेत.आणि पुढे लेणे क्रमांक १५ व १६ हे लेणे लेणे सर्वसाधारणपणे लेणे क्र. २ प्रमाणेच गौतम बुद्ध व बोधिसत्त्वांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. याशिवाय लेणे क्र. १६ हे लेणे क्र. १५ च्या वरती खोदले असून काही विद्वानांच्या मते मूळचे हीनयान पंथी असावे. या लेण्यात वज्रपाणी, बुद्ध व मैत्रेय यांची त्रिकूट शिल्पेही कोरण्यात आली आहेत. परंतु सध्याचा भाग गर्भगृह असावा असे वाटते. लेण्याचा बाह्य भाग कोसळलेला आहे. येथे महायान पंथाचा प्रभाव स्पष्ट दिसतो. बुद्धाच्या प्रतिमा सिंहासनावर प्रलंबपादासनात, आणि कमलपुष्पावर पद्मासनात धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत आहेत. त्याचबरोबर पद्मपाणी आणि वज्रपाणी बोधिसत्वांच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत. हे शिल्पकलेचे काम साधारणपणे इ.स. ५व्या शतकातील आहे.तसेच पुढे अत्यंत महत्त्वाचे लेणे ज्याचा क्रमांक १७, “यवन विहार” हे लेणे ग्रीक वंशीय, म्हणजेच यवन असलेल्या धम्मदेवाचा पुत्र इंद्राग्नीदत्त या भाविकाने खोदवून घेतले आहे. तो आपल्या वडिलांचा उल्लेख दत्तमिती (हे प्राचीन ग्रीकमधील दिमेत्रीपोलिस किंवा दिमित्रीस शहर असावे) या शहराचा रहिवासी असणारा ‘यवन’ असा करतो. त्यामुळे या लेण्याला ‘यवन विहार’ या नावाने ओळखले जाते. हे लेणे इ.स. १२० मध्ये खोदले गेले आहे. इंद्राग्नीदत्त हा नहपानाचा समकालीन मानला जातो. या लेण्याचा व्हरांडा तुलनात्मकदृष्ट्या बराच छोटा आहे. दर्शनी भागातील चार स्तंभ अष्टकोणी, स्तंभशीर्षासहित नहपान विहाराप्रमाणेच सुरेख व घाटदार आहेत. स्तंभशीर्षांवर हत्ती व स्वार कोरलेले आहेत. व्हरांड्याच्या एका बाजूला एका छोट्या कक्षाचे अर्धवट काम दिसते. व्हरांड्याच्या भिंतीवरच इंद्राग्नीदत्ताचा ब्राह्मी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखात इंद्राग्नीदत्ताने सदरचे लेणे व पाण्याचे टाके त्याच्या मातापित्याच्या स्मृतीप्रित्यर्थ खोदवून ते धम्मसंघाला अर्पण केले असल्याचा उल्लेख आहे. या लेण्याच्या अंतर्भागात फारसे शिल्पकाम आढळत नाही. आत दोन स्तंभ स्तंभशीर्षांसहित कोरलेले आहेत. गाभा-यासमोरचे दोन्ही स्तंभांचे काम अर्धवट राहिलेले दिसते. यांवरील स्तंभशीर्षांवर हत्ती व माहूत, तसेच काही स्वार कोरले आहेत. गाभा-यातील बैठकीवर मूर्ती कोरलेली नाही. मात्र बऱ्याच कालावधीनंतर या बैठकीवर अर्धवट शिवलिंग व शाळुंका कोरण्याचा प्रयत्न केला आहे. गाभा-याच्या दर्शनी भिंतीवर ३.५ फूट उंचीची उभी बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे, ज्यावर महायान पंथाच्या प्रभावाचे दर्शन घडते. याशिवाय या विहारात १६ कक्ष खोदलेले आहेत.यापुढे चैत्यगृह ज्याचा लेणे क्रमांक १८ आहे, हे एक चैत्यगृह आहे. या लेणीसमूहातील हे एकमेव चैत्यगृह आहे. या लेणीसमूहातील इतर लेण्यांपेक्षा हे बरेच आधी खोदले गेले आहे. याच्या शिलालेखांवरून कालगणना ठरवणे कठीण असले तरी महाहकुसिरी (महाहकुश्री) च्या उल्लेखामुळे आणि याच्या समकालीन कार्ले व बेडसे चैत्यगृहांच्या वैशिष्ट्यांनुसार, याचा कालावधी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातला मानला जातो. या चैत्यगृहाचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक व नाजूक कलाकुसरीने अलंकृत आहे. प्रवेशद्वारावर दुहेरी पिंपळपानाकृती कमान आहे. त्याच्या आत अत्यंत नाजूक वेलबुट्टीचे नक्षिकाम आहे. प्रवेशद्वारावर लाकडी दरवाजे अडकविण्यासाठी छिद्रे आहेत. याशिवाय दर्शनी भागात काष्ठवास्तुप्रमाणे तुळया कोरलेल्या असून त्यांच्या टोकाला मानवी चेहरे कोरलेले आहेत. याला ‘डेन्टिल्स’ म्हणतात. ग्रीक वास्तुकलेत दिसणाऱ्या या प्रकारच्या डेन्टिल्समुळे चैत्यगृहात ग्रीक वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो. चैत्यगृहातील स्तूप दंडगोलाकृती आहे आणि त्यावर हर्मिका कोरलेली आहे. त्याच्या लाकडी छत्राचा एक भाग आता नाहीसा झाला आहे. चैत्यगृहात तीन शिलालेख आहेत, त्यातील एका शिलालेखात भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर बांधले असल्याचा उल्लेख आहे.पुढे लेणे क्रमांक १९, “कृष्ण विहार” असून हे लेणे लेणे क्रमांक २० च्या थेट खालच्या तळमजल्यावर खोदलेले आहे. हे एक लहान विहार आहे. या लेण्यातील सभागृह व सर्व कक्ष अगदी परिपूर्ण चौरस आकारात खोदलेले आहेत. सर्व कक्षांच्या दरवाज्यांवर पिंपळपानाकृती कमान व काही नक्षी कोरलेली आहे. शिलालेखात सातवाहन राजा पहिला कण्ह (कृष्ण) चा उल्लेख असल्यामुळे हे लेणे ‘कृष्ण विहार’ म्हणून ओळखले जाते. लेणे क्र. १९ हे लेणे क्र. १८ च्या बाजूला आणि लेणे क्र. २० च्या खाली आहे. हे लेणे कण्ह सातवाहन काळात खोदले गेले असून आकाराने लहान आहे. यात सातवाहनकालीन प्राचीनतम शिलालेख आहे (इ. स. पू. सु. ३०-१२). या शिलालेखात नाशिकचा उल्लेखही आढळतो.पुढे लेणे क्र. २० मध्ये जाण्यासाठी लेणे क्र. १८ समोरील जिना वापरावा लागतो. हे एक विशाल लेणे आहे ज्यामध्ये ओसरी आणि मंडप आहेत. मंडपाला आठ खोल्या आहेत. या लेण्याचा उपयोग गौतमीपुत्र यज्ञश्री सातकर्णी यांच्या सातव्या वर्षी भिक्षूंनी करण्यास दिला, असे येथील शिलालेखात नमूद आहे. मागील भागात (गर्भगृहात) एक विशाल बुद्धमूर्ती व बोधिसत्त्वांची शिल्पे आहेत. तथापि, या लेण्यातील गर्भगृह आणि इतर मूर्ती दुसऱ्या टप्प्यात कोरल्या गेल्याच्या स्पष्ट खुणा या लेण्याच्या छतावर आणि बाजूच्या भिंतींवर आढळतात.त्यापुढे लेणे क्र. २१ आणि २२ हे साधारण प्रकारचे आहेत.पुढे लेणे क्र. २३ हे एक विशाल लेणे असून सहा ते सात लहान खोल्यांनी बनलेले आहे. या लहान खोल्यांचे काही भाग तोडून एक भव्य आवार तयार केले गेले आहे. या लेण्यात गौतम बुद्ध, अमिताभ बुद्ध, बोधिसत्त्व, नागराज इत्यादी शिल्पे, खंडित स्तूप आणि दोन शिलालेख आहेत.तर पुढे शेवटचे लेणे क्र. २४ हे दोन खोल्यांचे लहान लेणे आहे. या लेण्यात वाघ, बैल, कुबड असलेला उंट, मेंढ्या, डुकरे, हरीण, स्त्रीचे मुख असलेला घोडा, घुबड, उंदीर आणि लहान मुलांची शिल्पे तसेच दोन शिलालेख आहेत.एकंदरीत, त्रिरशमी लेणीत सांस्कृतिक विकासाचे तीन टप्पे आढळतात. पहिला टप्पा इ. स. पू. पहिल्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकापर्यंतचा आहे. या काळात लेणे क्र. १९ व १८ (चैत्यगृह) खोदली गेली. या लेण्यांतील स्तंभ अजिंठा येथील लेणे क्र. ९ आणि कोंडाणे विहार लेणे क्र. २ यांच्याशी साधर्म्य असलेले दिसतात, ज्यामुळे त्या एकाच कालखंडातील वाटतात. दुसरा टप्पा पाचव्या ते सहाव्या शतकानंतर सुरू होतो. या काळात गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्वांची शिल्पे मूळतः हीनयान पंथाशी संबंधित असलेल्या लेण्यांमध्ये कोरली गेली. या प्रक्रियेची सुरुवात कदाचित लेणे क्र. २ पासून झाली असावी. सातव्या शतकानंतर ही लेणी जैन आणि हिंदू धर्मांच्या प्रभावाखाली आल्याचे काही शिल्पांवरून दिसून येते.तर मग तुम्ही कसला विचार करताय… अशा कितीतरी लेण्या आहेत.. आज देखील त्या पांडव लेण्या म्हणून प्रचलित आहेत..चला तर मग आपण त्या सर्व लेण्यांवरती जाऊया … त्या लेण्यांचा अभ्यास करायला.. जसं त्रिरशमी लेणी तिची स्वतःची ओळख आणि इतिहास मिळाला… तशाच त्या लेण्या तुमची वाट बघतात .. इतिहासातील त्यांची नावं त्यांना पुन्हा मिळतील का? प्रश्न विचारतात?.. कोणी लेणी वरती शोध घेत येईल का? अभ्यास करून त्यांची ओळख त्यांना पुन्हा मिळवून देईल का?.. चला तर मग.. प्रत्येक पांडवलेणी वरती जाऊया …-विकी वामन येलवे वकील उच्च न्यायालय मुंबई. Post navigation👉 महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हे, त्यांच्या राजधान्या आणि महत्त्व