Nashik Tree Cutting | नाशिकमधील तपोवन परिसरात प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) महत्त्वाचा अंतरिम आदेश देत १५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वृक्षतोड थांबवावी, असे निर्देश लवादाने दिले आहेत, ज्यामुळे पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

काय आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे?

  • वकील श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादासमोर ही याचिका दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, लवादाने दिलेला हा अंतिम नसून केवळ अंतरिम (Interim) आदेश आहे.
  • वृक्षतोड करण्यापूर्वी आवश्यक असलेली न्यायिक प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केलेली नाही.
  • एकदा वृक्ष तोडल्यानंतर त्यांचे पुनर्लागवड (Replantation) यशस्वी होत नाही, असा पूर्वीचा अनुभव आहे.
  • यापूर्वी कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या प्रदर्शन केंद्राचा (Exhibition Center) कोणताही उपयोग झाला नाही.
  • या प्रकल्पाला आणि वृक्षतोडीला तीव्र विरोध असल्याचे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

    साधूग्राम प्रकल्प आणि वृक्षतोडीचा वाद

    २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका तपोवन परिसरात १,१५० एकर जागेवर साधू-महंतांच्या निवासासाठी ‘साधूग्राम’ उभारण्याची योजना आखत आहे. याच प्रकल्पासाठी सुमारे १८०० झाडे तोडण्याची योजना होती, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला.

  • स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्था आणि अनेक राजकीय तसेच सिने कलाकारांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे:

    विरोध करणारे प्रमुख चेहरे: अभिनेते सयाजी शिंदे, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    आंदोलन: मनसे आणि ठाकरे गटाकडून तपोवन येथे स्थानिक पातळीवर मोठे आंदोलन छेडण्यात आले होते, ज्यात ‘एकही झाड तोडू देणार नाही’ असा कडक इशारा देण्यात आला होता.

  • वृक्षतोडीच्या बदल्यात १५ हजार वृक्षांची लागवड

    एकीकडे वृक्षतोडीला विरोध होत असताना, दुसरीकडे राज्य सरकारने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच दक्षिण भारतातील राजमुद्री येथे भेट देऊन झाडांची निवड केली.

    • लागवड मोहीम: सुमारे १५,००० देशी झाडे नाशिकमध्ये टप्प्याटप्याने दाखल होत आहेत.
    • झाडांचे प्रकार: यात प्रामुख्याने १५ फूट उंचीच्या वड, पिंपळ, निंब, जांभूळ आणि आंबा यांसारख्या देशी वृक्षांचा समावेश आहे.
    • देखभाल व्यवस्था: मनपा उद्यान विभागामार्फत ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून या झाडांच्या देखभालीची व्यवस्था केली जाणार आहे.
    • प्रारंभ: मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सोमवारपासून या वृक्षलागवड मोहिमेला औपचारिक सुरुवात होणार आहे.

    राष्ट्रीय हरित लवादाच्या या अंतरिम आदेशामुळे साधूग्राम प्रकल्पाच्या कामाला १५ जानेवारीपर्यंत ब्रेक लागला आहे. आता या पुढील सुनावणीत लवाद काय निर्णय देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.