Pune Nashik Highway Elevated Corridor: पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास आता सुकर होणार आहे. सध्या दोन तासांहून अधिक वेळ लागणारा हा प्रवास फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आला आहे.
पुणे : पुणे आणि नाशिकदरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास वेळ वाचवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेनुसार नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) दरम्यान 28 किलोमीटरचा एलिव्हेटेड (उन्नत) कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. सध्या पुणे-नाशिक महामार्गावर या अंतरासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागत असला तरी नव्या मार्गामुळे हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पासाठी खेड तालुक्यातील काही गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी आणि चाकण ही गावे त्यात सामावलेली आहेत. विशेषत हा चाकण परिसरात औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्र असल्याने तेथे होणारी मोठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी बायपास मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. यासाठी मेदनकरवाडी, कडाची वाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी येथील जमिनी भूसंपादित केल्या जातील. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी या संदर्भात तातडीने सर्वेक्षण करून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
फक्त महामार्ग नव्हे, तर पुणे शहराला जोडणाऱ्या रिंगरोड प्रकल्पावरही बैठकीत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात नाशिक महामार्ग ते अहिल्यानगर मार्गादरम्यानच्या सोलू, सोलू इंटरचेंज, वडगाव शिंदे आणि निरगुडी या गावांची मोजणी पूर्ण झाली असून भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात अहिल्यानगर महामार्ग ते सोलापूर महामार्गादरम्यान आंबेगाव खुर्द आणि भिलारेवाडी गावांची संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच तिसरा आणि चौथा टप्पा सोलापूर रस्ता ते सातारा रस्ता व सातारा रस्ता ते पौड रस्ता या भागातील भूसंपादनावर लवकरच गती देण्यात येणार आहे.
या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांवर समन्वय साधण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह संबंधित प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारी वाहनसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी दैनंदिन कोंडी लक्षात घेता हे प्रकल्प तातडीने राबवण्याची गरज असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
पुणे-नाशिक महामार्गावरील एलिव्हेटेड रस्ता आणि रिंगरोड प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, वाहतुकीवरील ताण घटेल आणि शहरातील आर्थिक व औद्योगिक गतीमानतेलाही मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.