Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील  वांगेपल्ली येथील शाळेत कार्यरत असलेला सफाई कामगार अजय चंद्रगिरीवार ( खमनचेरू ) यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यानंतर कोणतीही चौकशी न करता अजयने विद्यार्थ्यांवर हात उगारला, असा आरोप आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून तब्बल 100 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.  संबंधित आरोपीने विद्यार्थ्यांच्या हातावर व पायावर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. हा भयंकर प्रकार आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय चंद्रगिरीवारला ताब्यात घेतलं आहे.

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक क्रीडा उपक्रमासाठी बाहेर गेले असताना ही संपूर्ण घटना घडली.घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली आणि शाळा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही पालकांनी केली आहे. “मोबाईल चोरीचा आरोप सिद्ध होण्याआधीच निष्पाप मुलांवर मारहाण करणे ही अमानुष व निंदनीय बाब आहे,”अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय चंद्रगिरीवारला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. तसच विद्यार्थ्यांचा जबाबही नोंदवला जात आहे. शासकीय निवासी शाळेत घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी सामाजिक संघटना व पालकांकडून केली जात आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एकरे यांनी दिली आहे.