महाराष्ट्र : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यामुळे तिथे विविध देशांतील तसेच राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. यामध्ये मुंबईतील ट्रेल्स ऍंड ट्रॅव्हल्सच्या कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या एकूण 67 पर्यटकांचा समावेश असून अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मदत आणि हेल्पलाईन क्रमांक जारी केले असून अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबालाही त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

महाराष्ट्र सरकारने दिली ही माहिती

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 300 हून अधिक पर्यटकांशी अद्याप संपर्क झालेला नसून महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी मुंबईतील ट्रेल्स ऍंड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल एजन्सीच्या 67 जणांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्र सरकारने एक परिस्थिती अहवाल जारी केला. यामध्ये त्यांनी राज्यातील शेकडो नागरिक अडकले असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, त्यापैकी काहीशी संपर्क झाला असून 150 नागरिक हे मानसरोवर येथे सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

राज्य सरकारने मदत आणि संपर्क क्रमांक

राज्य सरकारने याबाबत काही मदत आणि हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. राज्य सरकारने नातेवाईकांना माहिती देण्यासाठी आणि मदतीसाठी मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरु केला आहे.

> हेल्पलाईन नंबर : 9321587143, 1070, 022-22027990
> ईमेल आयडी: controlroom@maharashtra.gov.in

तसेच, नातेवाईकांना माहिती नोंदवण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाईन पोर्टल/लिंक देखील उपलब्ध करून दिली आहे.

माहिती नोंदवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी

नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माहिती नोंदवण्यासाठी लिंक: https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

राज्यातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री प्रतिक्रिया : नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नेपाळच्या दुर्घटनेत दगावलेल्या लोकांच्या कुटुंबाबाबत आमची संवेदना आहे. भारतीय लोकं आणि महाराष्ट्रातील लोकही तिथे असण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. गिरीश महाजन या सर्व घटनेत संपर्क ठेवून आहेत. काही लोकं तिबेटमध्येही गेले असल्याची माहिती आहे. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. दिल्लीच्या माध्यमातून मानसरोवर यात्रेला गेलेल्या पर्यटकांना परत आणण्याची योजना सुरु आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत. कोणाकडे काहीही माहिती असल्यास आम्हाला ती द्यावी, जेणेकरून आपली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास अधिक मदत होईल.” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.

 उपमुख्यमंत्री शिंदे प्रतिक्रिया : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही मदतीसाठी सक्रिय झाली आहे. नेपाळमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिक अडकले असून त्यामध्ये सातारा, महाबळेश्वर आणि पुणे परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचे तसेच त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली भूमिका असून, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन टीम समन्वयाने काम करत आहे.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.