Nashik : जिल्हा रुग्णालय ओपीडी विभागातर्फे रविवारी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत पोर्टल एक्सप्रेस मशीनचे उद्घाटन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.कर्करोग आजाराला रोखण्यासाठी नागरिकांची कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे स्कॅनिंग केली जाणार आहे. ही व्हॅन नाशिक विभागातील गावागावात जाऊन निशुल्क तपासणी करणार आहे. या मोहिमेला रविवारी (दि.९) सुरुवात झाली. व्हॅनद्वारे रुग्ण तपासणी होणार आहे.कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनअंतर्गत मुख कर्करोग स्तनकर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी आणि उपचार सुविधा दिल्या जाणार आहेत. व्हॅन अंतर्गत गावागावात जाऊन संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. नाशिक परिमंडळ नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात ही व्हॅन फिरणार आहे. याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले आहे.यावेळी डॉ. दिनेश बच्छाव, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर, सहाय्यक उपसंचालक डॉ. योगेश चित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेते, अधिसेविका अनिता भालेराव आदी उपस्थित होते.डॉ. निलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.र राहुल हडपे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. शिल्पा बांगर-गाभणे, मोहिमे अंतर्गत दंतशल्यचिकित्सक विभागप्रमुख-डॉ. दिनेश ढोले, स्त्रीरोगतज्ञ विभागप्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह दंतशल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम टीम व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींची उपस्थिती होती.व्हॅनमध्ये मुख कर्करोग तपासणीसाठी दंतशल्यचिकित्सक, डेंटल चेअर, चेक अप करण्यासाठीची साधनसामग्री, स्टरीलायझर, रेफ्रिजरेटर, सॉफ्ट वेअरद्वारे मुख कर्करोग तपासणी लॅपटॉप, पाणी व वीज सुविधांनी युक्त सुसज्ज असे युनिट आहे. स्त्रियांमधील स्तन कर्करोग तपासणीसाठी, स्त्रीरोगतज्ज्ञ, स्टाफ नर्स, स्वतंत्र कक्ष, गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी स्वतंत्र बेड, साधनसामुग्री, कोलको स्कोपी देण्यात आली आहे. संशयित रुग्णाची नंतर बायोप्सी करण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. Post navigationJCB इंडियाने नाशिकमध्ये नवीन ‘3S’ डीलरशिप सुविधा सुरू केली