नाशिक | प्रतिनिधी NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक २९ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकचे जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतनजी गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष रवी पगारे, दामोदर पगारे, राजू दादा दोत्रे, डॉ. अनिल कुरे, अमोल चंद्रमोरे, दीपक पगारे, युवराज मनारे, ताराचंद मोतमल आदी उपस्थित होते.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने अनिकेत काशीद, आदित्य निरभवणे, सम्यक बच्छाव, श्रेयस अहिरे, विजय सावंत, पूर्वेश, यश जाधव, ऋत्विक जाधव, वैभव वानखेडे, सम्राट संघारे, प्रणव खंडीजोड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना मिहिर गजबे म्हणाले, “पेपर फुटीच्या या सत्रामुळे देशातील अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा.”

आंदोलनात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीने, “हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे आवाहन केले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशातील सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा आर्थिक व मानसिक संघर्ष यावर पाणी फेरले गेले असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

• केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.

• NEET ची फेरपरीक्षा तात्काळ जाहीर करून ती पूर्णपणे विनामूल्य घेण्यात यावी.

• Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.

• राधाकृष्णन समितीच्या शिफारशी लागू करून NEET परीक्षा घेण्याची जबाबदारी NTA कडून UPSC कडे देण्यात यावी.

• देशभरातील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणांची NTA मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

• शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण थांबवून कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करण्यात यावा.

निवेदन स्वीकारताना जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत शासन स्तरावर या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

आंदोलन शांततामय वातावरणात पार पडले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने देण्यात आला.