Nashik नाशिक : दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालय) अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याची तब्बल ७० लाख रुपयांची रोकड लुटल्याची थरारक घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.९) सायंकाळी उघडकीस आला.

पंचवटी ( नाशिक ) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ‘भारत सरकार’ असा फलक लावलेल्या कारमधून आलेल्या टोळीने व्यापाऱ्याला चौकशीच्या नावाखाली जबरदस्तीने गाडीत बसवले, गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडील रोकड हिसकावून घेतली आणि महामार्गावर सोडून पसार झाले. या धाडसी प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजापती व्यापारी ७० लाख रुपयांची रोकड घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते. त्याच वेळी ‘भारत सरकार’ असा बोर्ड लावलेली कार तेथे येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या काही जणांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याला अडवले. त्याच्याकडील रोकड ही हवालाची असल्याचा आरोप करीत चौकशीसाठी सोबत येण्यास भाग पाडले.
सरकारी वाहन आणि अधिकाऱ्यांचा आव आणल्याने व्यापारी घाबरला. संशयितांनी त्याला गाडीत बसवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्याकडील ७० लाख रुपयांची रोकड काढून घेतली. काही अंतर गेल्यानंतर महामार्गावरील सेव्हन हेवन हॉटेलजवळ व्यापाऱ्याला खाली उतरवून टोळीने तेथून पलायन केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या फिल्मी स्टाइल लुटीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, ‘भारत सरकार’चा फलक लावलेल्या कारचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत