नाशिक: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे बळवंत नगर येथील वडीलोार्जित शेतजमीन कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी, तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पक्षपाती भूमिकेविरोधात ‘अत्याचार विरोधी कृती समिती’ (A.V.K.S.) यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक समोरील गेटवर जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी व गंभीर मुद्दे:
क्षेत्र व गट क्रमांक: मौजे बळवंत नगर (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील गट क्र. ३८४ (१८७) मधील एकूण १०१ गुंठे (क्षेत्र १.०० हेक्टर, पोटखराब ०.०१ आर) असलेली वडीलोार्जित शेतजमीन.
बेकायदेशीर खरेदी-विक्री: सदर जमिनीचे खरेदीखत क्र. १३९४/२००७, दिनांक २६/०६/२००७ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, इगतपुरी येथे नोंदवले गेले.
वारसांच्या हक्कांकडे दुर्लक्ष: सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे आणि कायदेशीर हक्क असताना, खरेदीदाराने (मदनलाल बसंतीलाल चोरडीया) आणि संबंधित यंत्रणेने कोणतीही पूर्वकल्पना किंवा पूर्वपरवानगी न घेता वारसांच्या हक्कांवर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटना कलमांचा अवमान: या प्रकरणात भारतीय संविधानाच्या कलम १४, १७ आणि २१ चा खुलेआम अवमान होत असून मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय स्पष्टपणे दिसून येतो.
अत्याचार विरोधी कृती समितीच्या प्रमुख मागण्या
१. मौजे बळवंत नगर, इगतपुरी येथील कथित खरेदीखत दस्त क्र. १३९४/२००७ (दि. २६/०६/२००७) तात्काळ रद्द/नांदत घोषित करण्यात यावा.
२. दुय्यम निबंधक विभागाचे संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी, खाजगी एजंट आणि खरेदीदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी.
३. दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची व कठोर कायदेशीर कारवाई करावी.
४. पीडित शेतकऱ्यांच्या निवेदनाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून देण्यात यावा.
५. पीडित कुटुंबाला तात्काळ सर्वपक्षीय संरक्षण पुरवण्यात यावे.
सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ठोस कारवाई न झाल्यास, राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, प्रसंगी विशेष अनुसुचित जाती-जमाती न्यायालय, उच्च न्यायालय, मानवाधिकार आयोग व संबंधित आयोगाकडे कायदेशीर लढा तीव्र केला जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

ऍड. राहुल विष्णू तुपलोंढे, रोहिणीताई जाधव मॅडम, राजेश ऊबाळे, डी.एन.रोकडे, सुमनबाई प्रभाकर मनोहर, वनिता भरीत, माया पोपट जगताप, सुरेखा पोपट जगताप, शोभा काळू कडलग, नितीन कडलग, भालचंद्र सिताराम गांगुर्डे आदि पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले