Tukaram Mundhe : महाराष्ट्र मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विरोधात धडक कारवाया सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून राज्यभरात ही मोहीम राबवली जात आहे.

राज्यात भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचं जेवण, गुटखा विक्री अशा अनेक कारवाया एफडीएकडून करण्यात आल्या आहेत. एफडीएकडून होत असलेल्या कारवायानंतर भेसळखोरांचेही धाबे दणाणले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या कामाचं मोठं कौतुक केलं जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आता नागरिकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये किंवा बाहेर कुठे जेवायला जाताना नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना चार गोष्टी तपासण्याचा सल्ला दिला आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील स्वच्छता पाहा, परवाना आहे की नाही ते तपासा, तुम्ही काय ऑर्डर केलं त्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही जो पदार्थ खाण्यासाठी घेणार आहात तो तुमच्या आहाराच्या गरजांना योग्य आहे की नाही याचा विचार करा, या चार गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला तुकाराम मुंढेंनी एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून चार गोष्टी तपासण्यास सांगितलं ?

१. स्वच्छतेकडे लक्ष द्या : रेस्टॉरंट, हॉटेल किंवा एखाद्या खाद्यपदार्थांच्या दुकानात ग्राहकांनी सर्वात आधी तेथील स्वच्छता तपासली पाहिजे. एफडीएच्या (FDA) अंमलबजावणी कारवाईत हा मुद्दा वारंवार समोर आलेला आहे, असं तुकाराम मुंढेंनी म्हटलं आहे.

२. दुकान/हॉटेलचा परवाना तपासा : तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, ते दुकान किंवा ते हॉटेल नोंदणीकृत किंवा परवानाधारक आहे का? हे नागरिकांनी तपासलं पाहिजे. तसेच परवानाधारक व्यवसायाला अन्न सुरक्षेच्या नियमांची माहिती असणं देखील गरजेचं आहे, असंही तुकाराम मुंढेंनी म्हटलं आहे.

३. फॅटयुक्त, खारट, गोड पदार्थ टाळा : जास्त फॅटयुक्त, जास्त खारट किंवा जास्त गोड पदार्थ टाळले पाहिजेत. अशा पदार्थांचं सेवन कधीतरी करणं ठीक आहे. मात्र, त्याचं वारंवार सेवन करणं टाळलं तर चांगलं, म्हणजे ग्राहकांनी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश किती होतो याबद्दल जागरूक असलं पाहिजे, असं तुकाराम मुंढेंनी म्हटलं आहे.

४. साजेसा आहार घ्या : रेस्टॉरंट, हॉटेल किंवा एखाद्या खाद्यपदार्थांच्या दुकानामध्ये फक्त स्वच्छतेपुरता मुद्दा मर्यादित नाही. घरी जेवण असो किंवा बाहेर, प्रत्येकाने ज्याच्या, त्याच्या वयाला साजेसा आहार घेण्याबाबत जागरूक असलं पाहिजे. ग्राहकांनी अन्नाच्या निवडीबाबत योग्य विचार केला पाहिजे, असंही तुकाराम मुंढेंनी म्हटलं आहे.