Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकातून (Kalyan Railway Station) एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील उपस्टेशन मास्तर (Deputy Station Master) आशुतोष कुमार याने एका महिला पॉइंट्समन असलेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला त्रस्त करत तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याची घटना घडली आहे. आरोपी अधिकारी मागील सहा महिन्यांपासून पीडित महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून आणि घरी येण्यासाठी दबाव टाकून त्रास देत होता.

या त्रासाला कंटाळून पीडित महिला कर्मचाऱ्याने महाराष्ट्र सैनिक रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले. संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट कल्याण रेल्वे स्थानकातील उपस्टेशन मास्तरच्या कार्यालयात धडक देत आरोपी आशुतोष कुमारला जाब विचारला.

यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि मनसे कार्यकर्त्यांनी उपस्टेशन मास्तरला कार्यालयातच चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस (GRP) घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.