नाशिक रोड येथील ‘अस्वनी बंगल्या’चे संवर्धन व विकास करण्यासाठी स्मृतीस्थळे संवर्धन समितीचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना निवेदननाशिक : नाशिक रोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय जुना ‘अस्वनी बंगला’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या स्मृती जपणारे महत्त्वाचे ठिकाण असून, या वास्तूचे संवर्धन करून त्याला अधिकृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळे संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्यास होते किंवा त्यांनी मुक्काम केला, अशा ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन, जतन आणि विकास करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर सन २०२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळे संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, खासदार तसेच आमदार यांची भेट घेऊन नाशिक रोड येथील अस्वनी बंगला स्मृतीस्थळ म्हणून घोषित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.समितीच्या म्हणण्यानुसार, १४ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिक रोड येथील या बंगल्यात मुक्कामी थांबले होते. येवला येथे धर्मांतराची घोषणा करण्यापूर्वीच्या काळात पुढील राजकीय, सामाजिक आणि वैचारिक भूमिकेबाबत चर्चा व नियोजन करण्यासाठी बाबासाहेबांचा या परिसरात मुक्काम असल्याचे स्थानिक समकालीन जाणकारांकडून सांगितले जाते.नाशिक रोड परिसरातील जुने-जाणते नागरिक आणि समकालीन व्यक्तींच्या आठवणींनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी वारंवार येणे-जाणे व वास्तव्य होते. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक तसेच सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, तिचे जतन करणे ही भावी पिढ्यांसाठी महत्त्वाची जबाबदारी असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.यावेळी समितीने अस्वनी बंगला केवळ शासकीय वास्तू म्हणून न ठेवता त्याचे ऐतिहासिक स्मारकात रूपांतर करावे, वास्तूचे मूळ स्वरूप जपून संवर्धन करावे आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास करावा, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली.या मागणीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी समितीच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक रोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अस्वनी बंगला परिसरात, महसूल विभागीय आयुक्त कार्यालय रोड, नाशिक रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळे संवर्धन समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन केल्यास नाशिकच्या सामाजिक इतिहासाला नवे अधोरेखन मिळेल. त्यामुळे अस्वनी बंगला स्मृतीस्थळ म्हणून घोषित करून त्याचे संवर्धन व विकास करण्याच्या मागणीला शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळे संवर्धन समितीचे अध्यक्ष कैलास तेलोरे, उपाध्यक्ष प्रमोद बागुल, खजिनदार किरण लोखंडे, अंबादास गवारे, मंगेश बनसोडे, बाळासाहेब घायवटे आदी उपस्थित होते. Post navigationविदेशी संशोधकाची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाला भेट सशक्त युवा, हरित नाशिकचा निर्धार ! Determination of strong youth, Green Nashik!