नाशिक : गेल्या काही काळापासून नाशिक शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. आता देवघरही सुरक्षित राहिलेले नाही, अशी स्थिती असल्याचे चित्र आहे. सिडकोतील चोरीची घटना ताजी असतानाच, भद्रकाली येथील प्रसिद्ध साक्षी गणेश मंदिरातून भरदिवसा दोन किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरीला गेली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अशी घटना घडली ?
मंदिराचे पुजारी दिलीप चंद्रिकाप्रसाद दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 या वेळेत ही चोरी झाली. वर्दळीच्या भद्रकाली परिसरात, सर्वांची नजर चुकवून चोरट्याने अंदाजे 1 लाख रुपये किमतीची चांदीची मूर्ती लंपास केली.

मंदिर दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या चोरीत चोरट्यांनी परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतल्याचे दिसून येते.

सीसीटीव्ही काढल्यामुळे : मंदिरात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे काढून ठेवण्यात आले होते.
बॅनरचा आडोसा: मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या मोठ्या बॅनरमुळे आतील हालचाली कोणालाही दिसू शकल्या नाहीत.
माहितगार असावा संशय: सीसीटीव्ही नसण्याची नेमकी वेळ साधल्याने, ही चोरी परिसरातील किंवा मंदिराची पूर्ण माहिती असलेल्या व्यक्तीनेच केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे.

आता तपास सुरू, मात्र पुरावे मिळेना
भद्रकाली पोलीस ठाण्याचे हवालदार काकड या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, समोरच्या बॅनरमुळे चोरट्याचा चेहरा स्पष्ट होऊ शकलेला नाही. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमधील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.